बारामती आठवडे बाजार असतानाही शेतकरी संपावर

By Admin | Published: June 2, 2017 01:41 AM2017-06-02T01:41:31+5:302017-06-02T01:41:31+5:30

बारामती तालुक्यांत आज शेतकरी संपाचा चांगला परिणाम जाणवला. दूध रस्त्यावर ओतले. आठवडे बाजार बंद पाडले. मात्र,

Baramati Weekly on Farmers Strike Despite Market | बारामती आठवडे बाजार असतानाही शेतकरी संपावर

बारामती आठवडे बाजार असतानाही शेतकरी संपावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती तालुक्यांत आज शेतकरी संपाचा चांगला परिणाम जाणवला. दूध रस्त्यावर ओतले. आठवडे बाजार बंद पाडले. मात्र, कोणताही अनुचित प्रकार यादरम्यान घडला नाही. संपाचा परिणाम उद्यापासून जाणवण्यास
सुरुवात होईल. बारामतीत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्या टोलनाक्यांवरच रोखण्यात आल्या. विविध शेतकरी संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला.
राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची झळ बारामतीच्या बाजारालादेखील बसली. आज गुरुवार आठवडे बाजार असतानादेखील संतप्त शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी जळोची येथील उपबाजारातील लिलाव आज सकाळी बंद पाडले, तर बाजार समितीच्या आवाराला कुलूप ठोकले. व्यापारी, आडते व विक्रेत्यांनी या संपाला पाठिंबा देत येणाऱ्या बुधवारपर्यंत बाजार समितीतील सर्व लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
याचदरम्यान किरकोळ भाजीपाला विक्री करणाऱ्या गणेश मंडईतील भाजीपाला विक्रीला शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र, किरकोळ विक्रेत्यांनी अगोदरच माल खरेदी केला होता. या मालाची विक्री आज झाल्यानंतर शुक्रवारपासून बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुरुवार हा बारामतीचा आठवडे बाजार असतो. त्यामुळे भाजीपाल्याची आवक आज तुलनेने जास्त असते. मात्र काल संध्याकाळी बारामती व इंदापूर तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका होऊन संपाची तयारी झाली. त्यामध्ये ठरलेल्या नियोजनानुसार शेतकऱ्यांनी आज भाजीपाला घेऊन विक्रीसाठी जायचे नाही व कोणी आल्यास लिलाव होऊ द्यायचे नाहीत असा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर आज सकाळी सहा वाजताच शेतकरी जळोची येथील बारामती बाजार समितीच्या उपबाजारात दाखल झाले. त्यांनी लिलाव पुकारण्यास सुरुवात करणाऱ्या व्यापाऱ्यांना आवाहन करीत लिलाव बंद ठेवण्याची सूचना केली. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. काही ठिकाणी तरीही लिलाव सुरू झाल्याचे समजताच आक्रमक शेतकऱ्यांनी हे लिलाव बंद पाडले.
या आंदोलनात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते एकत्र आले होते. छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण, राजेंद्र गावडे, बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे, संचालक सुनील पवार, प्रताप सातव, सचिव अरविंद जगताप, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल काटे, नगरसेवक सुधीर पानसरे, शिवसेनेचे सतीश काटे, राष्ट्रवादीचे जितेंद्र काटे, शीतल काटे, बारामती फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे, अविनाश काळकुटे, विजयसिंह बाबर आदींसह काही सरपंच व शेतकरी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Baramati Weekly on Farmers Strike Despite Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.