बारामती होणार हगणदरीमुक्त
By admin | Published: March 5, 2017 04:17 AM2017-03-05T04:17:28+5:302017-03-05T04:17:28+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बारामती शहरातील सर्व झोपडपट्टी भागात वैयक्तिक स्वच्छतागृहांची मोहीम शासनाच्या अनुदानातून हाती घेण्यात आली आहे.
बारामती : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बारामती शहरातील सर्व झोपडपट्टी भागात वैयक्तिक स्वच्छतागृहांची मोहीम शासनाच्या अनुदानातून हाती घेण्यात आली आहे. मागील वर्षी ११८ कुटुंबांना त्याचा लाभ मिळाला होता. आता शहरातील नव्या, जुन्या हद्दीतील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावर्षी जवळपास ४५०० कुटुंबांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट बारामती नगरपालिकेने ठेवले आहे. मागील वर्षी या मोहिमेत चांगले काम केल्यामुळे नगरपालिकेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.
उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या पूर्णपणे थांबविण्यासाठी नगरपालिका प्रशासन, पालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत ज्या नगरपालिकांनी वैयक्तिक स्वच्छतागृहांसाठी विशेष मोहीम घेतली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. बारामती नगरपालिकेला ७ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान या अंतर्गत प्राप्त झाले आहे. शहरातील २३ हजार ८४७ पैकी ९ हजार ५०० कुटुंबांनी त्यांची स्वच्छतागृहे बांधलेली आहेत. उर्वरित ४ हजार ६०० कुटुंबाला या योजनेतून स्वच्छतागृह बांधून देण्याचा निर्धार आहे.
या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, की या योजनेसाठी केंद्र शासनाकडून ८ हजार, राज्य सरकारकडून ४ हजार आणि नगरपालिका निधीतून ४ हजार असे १६ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्याला दिले जात आहे. स्वच्छतागृहाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे आणि नगरपालिका प्रशासनातील अन्य अधिकारी, कर्मचारी जागेवर जाऊन कामाची पाहणी करीत आहेत. पक्के बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणत: २० ते २२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
ज्या शहरात ९५ टक्केपेक्षा अधिक नागरिक वैयक्तिक स्वच्छतागृहांचा वापर करीत आहेत. त्या शहरांना ‘ओडीएफ प्लस प्लस’ असा दर्जा शासनाकडून दिला जात आहे. याचा अर्थ हगणदारीमुक्त शहर हा दर्जा कायमस्वरूपी प्राप्त करण्यासाठी हा दर्जा सरकारकडून दिला जात आहे. ज्या कुटुंबाकडे स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा नाही, अशा ठिकाणी ३ कुटुंबांना एकत्र करून ग्रुप स्वच्छतागृहाची योजनादेखील याच अंतर्गत राबविली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दोन वर्षांत लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट
येत्या दोन वर्षांत बारामती शहर संपूर्णपणे हगणदरीमुक्त करण्याचे ध्येय आहे. त्याच दृष्टीने दर महिन्याला किमान ३०० स्वच्छतागृहांचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. सध्या शहरामध्ये असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचीदेखील या कामानंतर दुरुस्ती केली जाणार आहे.
वैयक्तिक स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापरच करू नये, असे प्रयत्न होतील. याशिवाय फक्त बाहेरून कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा, असे धोरण आहे. त्यामुळे जास्तीतजास्त वेगाने काम सुरू करण्यात आले आहे.
यासाठी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, सर्व प्रभागातील स्थानिक नगरसेवक यांच्यासह स्थानिक सामाजिक संघटनांचीदेखील मदत घेतली जात आहे. योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्य ठेवले जात आहे, असे त्यांनी सांगितले.