बारामतीतही झाला 'शोले', कारण मात्र भलतंच...!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 06:51 PM2022-09-22T18:51:09+5:302022-09-22T19:09:22+5:30
सामाजिक कार्यकर्ते व शहर पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश...
बारामती (पुणे) : आईसोबत झालेल्या किरकोळ भांडणावरून दारूच्या अंमलाखाली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या छतावर चढलेल्या तरुणाला खाली उतरविण्यात सामाजिक कार्यकर्ते व शहर पोलिसांना यश आले. बुधवारी (दि. २१) रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी बारामतीकरांनी बसंतीचा विषय नसूनदेखील शोले चित्रपटाची आठवण झाली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हनुमंत मिसाळ (वय २२ वर्षे, रा. आमराई, बारामती) असे या युवकाचे नाव आहे. तो बुधवारी रात्री घरात आईसोबत वाद झाल्याने त्याची मन:स्थिती बिघडली. तो दारूच्या नशेत होता. तसेच आत्महत्या करतो, असे सांगत होता. तो थेट शहरातील आंबेडकर स्टेडियमच्या छतावर चढल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी तातडीने घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्याने पोलीस तत्काळ या ठिकाणी पोहचले. या प्रकाराची माहिती समजल्यावर स्टेडियम परिसरात गर्दी वाढू लागली. यावेळी पोलीसांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली. त्या युवकाला भावनिक साद घालत पोलिसांनी येथील पोलीस मित्र व समाजसेवकांच्या मदतीने सुखरूप खाली उतरविले.
दारूच्या नशेत आत्महत्येसाठी उंचावर उभारलेल्या या युवकाला खाली उतरविणे जिकिरीचे होते. त्याचा तोल गेला असता अनर्थ घडण्याची भीती होती. मात्र, पोलिसांनी तत्परतेने सूत्र हलविली. त्याला खाली उतरविण्यास यश आले. त्यानंतर सदर युवकाला पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
अग्निशामक दल येण्यापूर्वीच युवकाला खाली आणण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, पोलीस कर्मचारी अकबर शेख, बंडू कोठे, पोलीस नाईक शिंदे, देवकर यांच्यासह मंगलदास निकाळजे, रवी सोनवणे, नगरपालिका कर्मचारी सुरज शिंदे यांनी संबंधित तरुणाला खाली घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.