बारामतीकरांनो, काळजी घ्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:13 AM2021-09-14T04:13:46+5:302021-09-14T04:13:46+5:30
बारामती: कोरोनाचे सावट अजून देखील घोंगावतच आहे. त्यामुळे बारामतीकरांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी, आरतीसाठी गर्दी ...
बारामती: कोरोनाचे सावट अजून देखील घोंगावतच आहे. त्यामुळे बारामतीकरांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी, आरतीसाठी गर्दी करू नये याबाबत एका ध्वनिफितीच्या मदतीने शहरात सर्वत्र प्रबोधन करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. शहरात गणेशोत्सवामुळे अनेक ठिकाणी आता पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. या गर्दीमुळे प्रशासनाचीही चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना सावध करण्यासाठी पोलिसांनी ही प्रबोधन मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनो कोरोना अजून संपलेला नाही, त्यामुळे काळजी घ्या. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये अनेकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे, या पार्श्वभूमीवर आपल्या वागणुकीने तिसरी लाट येऊ शकते. याचे भान नागरिकांनी ठेवा. आपण केलेल्या गर्दीमुळे आप्तस्वकीयांच्या जिवावर बेतण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाला स्वत:हून आमंत्रण देऊ नका, मास्कचा वापर करा व सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, त्याचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.