शासनाच्या निर्बंधांना बारामतीकरांचाच ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:08+5:302021-04-20T04:10:08+5:30
असताना नागरिकांची रस्त्यावर गर्दी बारामती : बारामती शहरात नागरिकांनी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांनाच ‘ब्रेक’ केल्याचे चित्र ...
असताना नागरिकांची रस्त्यावर गर्दी
बारामती : बारामती शहरात नागरिकांनी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांनाच ‘ब्रेक’ केल्याचे चित्र सोमवारी (दि. १९) रस्त्यावर पाहायला मिळाले. शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे प्रशासन गॅसवर असताना काही उदासीन नागरिक मात्र बिनधास्त रस्त्यावर गर्दी करताना दिसून आले.
बारामतीत शहरात सरासरी प्रतिदिन २५० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे दुकाने बंद करून १४ दिवस उलटले आहेत. एवढे दिवस व्यवसाय, दुकाने बंद ठेवून सर्व व्यावसायिकांनी मोठे नुकसान सोसले आहे. मात्र, काही उदासीन नागरिक घरात थांबण्यास तयार नाहीत. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांनी अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, याबाबत शासनाचे निर्देश आहेत. मात्र, याकडे सुरुवातीचे काही दिवस दक्ष असणारे प्रशासन देखील दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. बारामतीचे सुपरस्प्रेडरचा शोध घेण्याची गरज आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू केले. १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी असून १४४ कलम लागू करण्यात आले आहे. केवळ आवश्यक सुविधा सुरू राहतील, अत्यावश्यक काम नसेल तर कोणीही घराबाहेर पडू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, मोठ्या संख्येने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याबाबत विचारणा होताना दिसून येत नाही. पोलीस, महसूल आणि नगर परिषद प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेण्याची गरज आहे.
सुरवातीचे काही दिवस राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांना बारामतीकरांनी प्रतिसाद दिला. काही रस्त्यांचा अपवाद वगळता शहर सीलबंद करण्यात आले आहे. शहरातील मुख्य चौकात बॅरिगेड लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकात येणारे मुख्य रस्ते बंद करण्याचे नियोजन यशस्वी ठरले आहे. शहरातील चौकाचौकांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत.शहरात चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी वाहनांची कसून चौकशी होणे आवश्यक आहे. गेले काही दिवस रस्त्यांवर असणाऱ्या शुकशुकाटाची जागा आता गर्दीने घेतली आहे.
एप्रिल महिन्यात १९ दिवसांत आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने चार हजारांचा आकडा ओलांडला आहे. १९ दिवसांत शहर आणि तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ४५२२ झाला आहे.गतवर्षीच्या तुलनेने ही आकडेवारी कितीतरी अधिक आहे.
काही उदासीन नागरिकांसह काही कोविड रुग्णांमुळे कोरोना पसरत आहे. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनसाठी धावाधाव सुरुच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. खासगी रुग्णालयांची यंत्रणा देखील यास अपवाद नाही. प्रतिदिन येणारे सुमारे २५० रुग्णांना उपचार देण्याचे आव्हान प्रशासन आणि सामाजिक संस्थांसमोर आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत एकूण पॉझिटिव्ह-२०६ आले आहेत. यामध्ये शहर-१०७ ग्रामीण- ९९ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत बारामतीत एकूण रूग्णसंख्या-१३हजार ८८७ वर पोहचली आहे.तर एकूण बरे झालेले रुग्ण- १०५८८ वर गेले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
——————————————