‘कॅशलेस’ व्यवहारांकडे बारामतीकरांचा कल
By admin | Published: December 24, 2016 12:13 AM2016-12-24T00:13:25+5:302016-12-24T00:13:25+5:30
बारामती शहरात नोटाबंदीला दीडमहिना उलटल्यानंतर देखील चलन तुटवड्याच्या समस्येवर व्यापारी वर्गाने नागरिकांच्या पाठींब्यामुळे
बारामती शहरात नोटाबंदीला दीडमहिना उलटल्यानंतर देखील चलन तुटवड्याच्या समस्येवर व्यापारी वर्गाने नागरिकांच्या पाठींब्यामुळे मात केल्याचे चित्र आहे. शहरात सर्वत्र रोख व्यवहारांऐवजी कॅशलेस व्यवहारामध्ये चांगला प्रतिसाद आहे. शहरातील विविध व्यवसायांमध्ये ‘कॅशलेस’ व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. जवळपास ८० टक्क्यांहून अधिक व्यवहार कॅशलेस झाल्याची माहिती या व्यावसायिकांनी दिली.
कॅशलेस व्यवहारामध्ये प्रशिक्षणासाठी बँकांनीदेखील पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध प्रशिक्षण दिले जात आहे. कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी बँकांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा ठरत आहे. बारामती शहरातील अजिंक्य बझारचे मालक अतुल गांधी यांनी सांगितले, की ग्राहकांचे ७५ टक्के व्यवहार कॅ शलेस झाले आहेत. केवळ २५ टक्के व्यवहार रोखीने सुरू आहेत. ‘ कॅ शलेस’ साठी
ग्राहकांचा पुढाकार अधिक आहे.
शहरातील सराफ व्यावसायिक महेश ओसवाल यांनी सांगितले, की या निर्णयामुळे गरजुंची गैरसोय झाली आहे. ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी आवश्यक असणाऱ्या मशिन अद्याप मिळालेल्या नाहीत. या मशिनची आवश्यकता असणाऱ्यांची प्रतीक्षा यादी आहे.
तर नोबल मॉलचे प्रमुख मुस्तफा बोहरी यांनी ८० ते ९० टक्के व्यवहार ‘कॅशलेस’ झाल्याचे सांगितले. या व्यवहारामुळे व्यवसाय अधिक सोपा झाला आहे. विविध योजना आणल्या आहेत. शून्य टक्के व्याजदराच्या तसेच शून्य रुपये डाऊन पेमेंट करून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे ग्राहकांना शक्य झाली आहे.
बांधकाम व्यावसायिक बोराडे असोसिएट्सचे प्रमुख दत्तात्रय बोराडे यांनी सांगितले, की ‘कॅशलेस’मुळे व्यवहार व्यवस्थित होतात. सदनिका नोंदणीसाठी धनादेशदेखील स्वीकारत आहे. बांधकामासाठी आवश्यक सहित्याची खरेदी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी धनादेश वापरत असल्याचे ते म्हणाले. कोणतीही मोठी रक्कम जवळ बाळगण्याची भीती राहिली नाही.
अजिंक्य बिग बझारचे अविनाश गांधी यांनी सांगितले, की ‘कॅशलेस’ व्यवहारामुळे सुट्या पैशांची समस्या मार्गी लागली आहे. ९० टक्के ग्राहक कार्डचा वापर करून खरेदी करत आहेत. एसबीआयच्या वतीने ग्राहकांना त्यांचे कार्ड स्वाईप करून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतात. जेजे टीव्हीएसचे संचालक राजेश शहा यांनी सांगितले, की नोटाबंदीचा परिणाम व्यवसायावर झाला नाही. वाहनांच्या विक्रीमध्ये थोडी घट झाली आहे. वाहन नोंदणीसाठी, खरेदीसाठी कार्डद्वारे रक्कम स्वीकारण्याची सोय केली आहे. शिवाय ‘इन्कम प्रूफ’ असणाऱ्या ग्राहकांना शून्य पैशांमध्ये वाहन खरेदी करण्याची सोय केली आहे. वाहन सर्व्हिसिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांना कार्डद्वारे पैसे स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे. एसबीआय बँकेकडे ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी स्वाईप मशिनची ६० ते ७० टक्के व्यावसायिकांनी मागणी केली आहे. त्यापैकी डीव्हाईस मशिन देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, अधिक मागणी असणाऱ्या पोर्टेबल मशिन सध्या उपलब्ध नाहीत त्यालाच मोठी मागणी आहे. हे मशिन मोबाईलप्रमाणे कुठेही नेता येते. त्यासाठी बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितली.
बांधकाम व्यावसायिक संघवी डेव्हलपर्सचे नगरसेवक संजय संघवी, देवराज बिल्डर्सचे विक्रांत तांबे यांनी कॅशलेस व्यवहाराला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. फ्लॅट बुंकिंगसाठी ग्राहकांना चलनटंचाईची झळ बसू नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.