बारामतीचा पारा ४१ अंशांवर
By admin | Published: April 16, 2016 03:50 AM2016-04-16T03:50:47+5:302016-04-16T03:50:47+5:30
शहरात सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (दि. १५) चालू वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद ४१.२ अंश सेल्सिअस झाली.
बारामती : शहरात सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (दि. १५) चालू वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद ४१.२ अंश सेल्सिअस झाली. कालपर्यंत ३९ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान घुटमळणारा पारा आज थेट ४१ अंशांवर पोहोचला.
गेल्या चार-पाच दिवसांपासून बारामतीचा पारा ४० अंशांच्या आसपासच घुटमळत आहे. गेल्या काही दिवसांत सकाळी ९ वाजल्यापासूनच प्रखर ऊन राहू लागले आहे. आग ओकणाऱ्या सूर्याचा अनुभव बारामतीकर घेत आहेत. भाजून काढणाऱ्या या तापमानामुळे शहरात सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत रस्त्यावर अघोषित संचारबंदी लागू होत आहे. एकीकडे वाढत्या तापमानाच्या फटक्यामुळे रस्ते निर्मनुष्य होत आहेत. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शुक्रवारी कमाल ४१.२, तर किमान २१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढते तापमान, गेल्या काही वर्षांपासून झालेल्या अत्यल्प पावसाचा परिणाम सर्वच घटकांवर जाणवत आहे. भूगर्भातील पाणीपातळी खोलवर गेली असून नदी-नाले कोरडे पडले आहेत. जिरायती भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात आहे. ३१ टँकरने या परिसरातील गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, नीरा डावा कालव्यालगतच्या विहिरींना दिलासा मिळाला आहे. कालव्याचे पाणी झिरपुन काही प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. प्रखर उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्र्या, रूमाल आदींचा वापर करूनच घराबाहेर पडावे लागत आहे. तर रसवंती गृह, शीतपेय केंद्रांमध्ये थंडावा मिळविण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. (प्रतिनिधी)
वाढत्या तापमानामुळे पिकांवर विपरित परिणाम
वाढत्या तापमानामुळे पिकांवर विपरित परिणाम होण्याची भीती आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पिकांची पाण्याची गरज वाढणार आहे. ही गरज पूर्ण न झाल्यास पिके जळून जाण्याचा धोका संभवतो. एप्रिलच्या मध्यालाच पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. आपल्या परिसरात सरासरी
४२ अंश सेल्सिअस तापमान असते. मात्र, यंदा तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद अली यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.