बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही - संभाजी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 06:50 PM2018-07-07T18:50:09+5:302018-07-07T18:52:01+5:30
बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नसल्याचे म्हणत संभाजी भिडे यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीच्या वादात उडी घेतली आहे.
पुणे: बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नसल्याचे म्हणत संभाजी भिडे यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीच्या वादात उडी घेतली आहे. पुण्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं आगमन होणार आहे, यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून भक्ती-शक्ती संगमासाठी शेकडो धारकरी शिवाजीनगर भागात दाखल झाले आहेत. यावेळी भिडे गुरुजी संबोधित करत होते.
संचेती पुलापासून ते वारीत सहभागी झाले आहेत. परंतु पोलिसांनी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, यासाठी नोटीस बजावली होती. संभाजी भिडे यांचे शेकडो अनुयायीही त्याच्याबरोबर पुण्यात उपस्थित आहेत. जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी धारकऱ्यांना (स्वयंसेवकांना) संबोधित केले. मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून 500 पेक्षा अधिक स्वयंसेवक आले आहेत.
गेल्या वर्षीसुद्धा पालखी सोहळ्यातील संभाजी भिडेंच्या सहभागावरून वाद झाला होता. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत वाद झाल्यानं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह जवळपास अनेकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते.