मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी बडोदा प्रयत्न करेल : राजमाता शुभांगिनीराजेंचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:34 PM2017-12-23T18:34:59+5:302017-12-23T18:39:57+5:30
बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्यकर्ते हा प्रश्न सोडविण्यास कमी पडत आहेत. लोकसभेच्या २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी बडोदा मतदारसंघातील नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून तुम्ही स्वाक्षरी केली आहे, अशी आठवण राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांना करून देत या प्रश्नासंबंधी पुढाकार घेऊन दर्जाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी घ्यावी अशी सूचक टिपण्णी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षांनी केली, त्यावर ’आम्ही नक्कीच सहकार्य करू, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे बडोद्याचे साहित्य संमेलन ठरेल’,असे आश्वासन गायकवाड यांनी दिले.
बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र आणि बडोद्याच्या ॠणानुबंधाचा उल्लेख करीत साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी भाषणात मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याच्या प्रलंबित मुद्द्याकडे लक्ष वेधले. दर्जाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना मदत केल्याचे स्मरण करून देत आता दर्जाच्या प्रस्तावावर तुम्ही मोदी यांची स्वाक्षरी घेऊन द्यावी अशी गळ जोशी यांनी गायकवाड यांना घातली. त्याला तात्काळ प्रतिसाद देत शुभांगिनीराजे गायकवाड यांनी आम्ही नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी बडोदा संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, कार्यवाह वनिता ठाकूर, आशिष जोशी, मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
शुभांगिनी राजे गायकवाड म्हणाल्या, की महाराष्ट्र आणि गुजरातचे खूप वर्षांपासून ॠणानुबंध आहेत. बडोद्यामध्ये मराठी भाषिकांची संख्या खूप मोठी आहे. खूप वर्षांनी बडोद्यामध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहे, हे संमेलन चांगले व्हावे अशी आमची इच्छा आहे. सयाजीराव गायकवाड यांचे १२५ खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले आहेत, त्यापुढील २० ते २५ खंडांचे प्रकाशन बडोद्याच्या साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे याचा विशेष आनंद आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडा जोशी यांनी केले तर प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.
आम्हाला कसतरीच वाटतंय...पी.डी पाटील यांचे भावोद्गार
बडोद्याच्या आयोजकांनी संमेलनाच्या मदतीसाठी महाराष्ट्राला साद घातली, त्यावर भाष्य करताना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांचे दातृत्व खूप मोठे होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्ती दिली होती. महात्मा फुले यांनाही मदत केली होती. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे मागणं कसतरीच वाटतंय, असे भावोद्गार पी. डी. पाटील यांनी काढले आणि संंमेलनाला २५ लाख रूपये देत असल्याचे जाहीर केले.
मोदींनाही देणार निमंत्रण; पण संमेलनात राजकारण आणणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरातचाच माणूस पंतप्रधानपदी आज विराजमान आहे, त्यामुळे बडोदा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. मात्र संमेलनात राजकारण आणणार नाही, अशी स्पष्टोक्त्ती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनी दिली.
जयपूरच्या लिटररी संमेलनाला आपणहून रसिक जातात; मग आपल्या मराठी भाषेच्या संमेलनालाही आपणहून यायला हवं
निमंत्रितांनी मानधन आणि प्रवास खर्च न घेता संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले होते. त्याविषयी छेडले असता संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी संमेलनाचा खर्च हा दोन कोटी रूपये आहे. सर्वस्तरातून मदतीचा ओघ आता सुरू झाला आहे. निमंत्रितांना मानधन देणार नाही, असे नाही मात्र त्यांनी अपेक्षा न ठेवता संमेलनात सहभागी व्हावे इतकेच आवाहन केले होते. त्याला दुजोरा देत जयपूर येथे होणाऱ्या लिटररी संमेलनाला रसिक, साहित्यिक मंडळी स्वच्छेने येतात. आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या भाषेच्या उत्सवाला आपणहून यायला हवं अशी अपेक्षा राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनी व्यक्त केली.
गुजराती भाषेतले साहित्य मराठीत अनुवादित; प्रमाण कमी
गुजराती भाषेतले साहित्य मराठीमध्ये अनुवादित झाले नाही असे नाही मात्र प्रमाण थोडे कमी आहे. यात अनुवादक कमी आहेत म्हणून दोष देता येणार नाही तर अनुवादकाला पुढे घेण्यासाठी यंत्रणाच गुजरातमध्येच काय तर महाराष्ट्रातही नाही. मात्र बडोद्यामधील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दोन भाषांची एकमेकांना ओळख होईल, असा विश्वास खोपकर यांनी व्यक्त केला.