पिकांना मिळतोय कूपनलिकांचा आधार
By admin | Published: March 25, 2017 03:40 AM2017-03-25T03:40:30+5:302017-03-25T03:40:30+5:30
पूर्व हवेलीत यंदाच्या पावसाळ्यात जास्त पर्जन्यमान न झाल्याने भूजलपातळीत घट झाली आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदण्याचा सपाटा
कोरेगाव मूळ : पूर्व हवेलीत यंदाच्या पावसाळ्यात जास्त पर्जन्यमान न झाल्याने भूजलपातळीत घट झाली आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदण्याचा सपाटा लावला आहे. कूपनलिकेवर लाखो रुपयांचा खर्च होत असल्याने शेतकरी कंगाल आणि कूपनलिका खोदणारे मालामाल होऊ लागले आहेत.
नागरिक, शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिक वैयक्तिक वापरासाठी कूपनलिका खोदू लागले आहेत तर ग्रामीण भागातील शेतकरी पिके जगविण्यासाठी कूपनलिका खोदत आहेत. जिल्ह्यात शाश्वत पाणी नसतानाही जादा पाणी लागणारे उसासारखे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. उसाचे पीक घेणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना कूपनलिकेचे पाणी आहे. भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतात उभे असलेले ऊस आणि अन्य पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकरी कूपनलिका खोदणे पसंत करीत आहेत.
कूपनलिका खोदणारांची संख्या अल्प होती. परंतु फेब्रुवारी महिन्यापासून दिवसेंदिवस कूपनलिका खोदणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कूपनलिका खोदण्याच्या दरातही वाढ होऊ लागली आहे.
मार्च महिन्यात प्रतिमीटर २३० ते २४० रुपये या दराने कूपनलिका खोदल्या जात आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांची ग्राहकांची संख्या मोठी व कूपनलिका खोदणाऱ्या मशिनची संख्या अल्प असल्याने अनेक शेतकऱ्यांना बुकिंग करावी लागत आहे. बुकिंग केल्यानंतर १० ते १५ दिवसांनी मशिन उपलब्ध होत आहे. एका कूपनलिकेसाठी किमान २५ ते ८० हजार रुपये खर्च होत आहे. कूपनलिकेला पाणी लागल्यानंतरसबमर्सिबल पंप खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च वेगळाच करावा लागत आहे. हा खर्च शेतकरी फक्त पिके जगविण्यासाठी करू लागला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना पाण्यावर लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असला तरी शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले आहे.
(वार्ताहर)