साखरेला आधारभूत किंमत द्यावी

By admin | Published: October 1, 2015 12:54 AM2015-10-01T00:54:16+5:302015-10-01T00:54:16+5:30

उसाला एफआरपीप्रमाणे बाजारभाव देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेला आधारभूत किंमत द्यावी, या मागणीचा ठराव रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या

The base price should be given to the sugar | साखरेला आधारभूत किंमत द्यावी

साखरेला आधारभूत किंमत द्यावी

Next

न्हावरे : उसाला एफआरपीप्रमाणे बाजारभाव देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेला आधारभूत किंमत द्यावी, या मागणीचा ठराव रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
न्हावरे येथे कारखान्याची २४ वी वार्षिक सभा अध्यक्ष अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके, माऊली काळे, विजय मोकाशी, खासेराव घाटगे, कुंडलीक शितोळे उपस्थित होता.
कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांनी स्वागत केले. त्यानंतर गतवर्षी दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पवार म्हणाले, कारखान्याची आगामी गळीत हंगामाची एफआरपी २२७७ रुपये इतकी असून, साखरेचे भाव असेच राहिल्यास ही रक्कम शासकीय अनुदानाशिवाय देणे अशक्य आहे. तरीदेखील कारखान्याच्या प्रत्येक खर्चात काटकसर करून शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळवून देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा राहील. सध्याच्या काळात साखर कारखानदारी फार मोठ्या आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत आहे. राज्यामध्ये एकही साखर कारखाना असा नाही की ज्याने एफआरपीसाठी कर्ज घेतले नाही.
घोडगंगाने २०१३-१४ व १४-१५ या दोन्ही हंगामाची एफआरपी देण्यासाठी चाळीस कोटी रुपये कर्ज काढले आहे. सध्याच्या काळात साखर कारखानदारीसमोर असलेल्या आर्थिक अडचणी विचारात घेऊन या कर्जाचे शासनाने अनुदानात रुपांतरित करावे. एफआरपीची रक्कम देताना प्रत्येक कारखान्यास मागील हंगामाच्या साखर उताऱ्याचा निकष लावला जातो. परंतु काही कारखान्यांकडे को-जन, आसवणी प्रकल्प असले, तरी त्यांची एफआरपी साखर उताऱ्याच्या निकषामुळे सहप्रकल्प नसलेल्या कारखान्याइतकीच आहे. घोडगंगाकडे फक्त सध्या आसवणी प्रकल्पच आहे. अशा परिस्थितीत सर्व सहप्रकल्प असणाऱ्या कारखान्यांशी घोडगंगाला एफआरपी देताना आज स्पर्धा करावी लागत आहे, असे पवार म्हणाले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजीराव पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन करुन सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. मागील सभेचा इतिवृत्त व विषयपत्रिकेवरील पहिले तेरा विषय सभासदांनी पंधरा मिनिटांतच एकमताने मंजूर केले. देशामध्ये उत्पादित होणाऱ्या साखरेच्या २८ टक्के साखर घरगुती वापरासाठी, तर उर्वरित ७२ टक्के साखर विविध उद्योगधंद्यांसाठी वापरली जाते.
शासनाने घरगुती वापरासाठीच्या साखरेसाठी ३० रुपये, तर औद्योगिक वापरासाठीच्या साखरेचा दर ५० रुपये ठरवावा, असा ठराव शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घाटगे यांनी केंद्र व राज्य सरकारवर खरमरीत टीका करत आक्रमकपणे मांडला. या ठरावाला सभासदांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून हात उंचावून एकमुखी मंजुरी दिली.
सी. रंगराजन समितीच्या अहवालातील शिफारशी शासनाने मान्य कराव्यात. या शेतकरी संघटनेच्या शरद गद्रे व घाटगे यांनी मांडल्या ठरावाला सभेने तत्काळ मान्यता दिली.
सभेच्या कामकाजातील चर्चेत दिगंबर फराटे, विजय कोंडे, भरत चोरमले, काकासाहेब खळदकर, आंबुजी बोरकर, अशोक शितोळे आदींनी सहभाग घेतला.
सभेचे सूत्रसंचालन मंगेश ढवळे यांनी, तर आभार कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: The base price should be given to the sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.