कुकडी प्रकल्पातील धरणांनी गाठला तळ

By admin | Published: April 9, 2016 01:54 AM2016-04-09T01:54:30+5:302016-04-09T01:54:30+5:30

कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. प्रकल्पातील डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून

The base reached by the dams of the Kukadi project | कुकडी प्रकल्पातील धरणांनी गाठला तळ

कुकडी प्रकल्पातील धरणांनी गाठला तळ

Next

डिंभे : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. प्रकल्पातील डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून, आजमितीस या प्रकल्पात केवळ ३.११ टीएमसी म्हणजेच केवळ १० टक्केएवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी या प्रकल्पात ७.४१ टीएमसी म्हणजेच २४.६० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. हाताशी असणाऱ्या पाण्याचे काटकसरीने वापर न झाल्यास, यंदा उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत, तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी योजना धोक्यात येऊन धरणांच्या आतील आदिवासी गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्पावर जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकूण ७ तालुक्यांमधील सुमारे १ लाख ५६ हजार २७८ हेक्टरएवढे मोठे क्षेत्र कालव्यांद्वारे सिंचनाखाली आले आहे. सर्वत्र बागयती पिके घेतली जाऊ लागल्याने यंदा उन्हाची तीव्रता वाढू लागताच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. मात्र कुकडी प्रकल्पाची या वर्षीची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. प्रकल्पात येणाऱ्या पाच धरणांपैकी येडगाव व डिंभे धरण वगळता बाकी माणिकडोह, वडज व पिंपळगाव जोगा या तीन धरणांत जवळपास शून्य टक्के पाणीसाठा राहिला आहे. सध्या केवळ डिंभे धरणात १० टक्केएवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून सध्या ६०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून डाव्या कालव्याद्वारे पाणी येडगाव धरणात टाकण्यात येत आहे.
मागील वर्षाची तुलना करता यंदाच्या उन्हाळयात प्रकल्पातील सर्वच धरणांतील पाणाीसाठ्यात घट झाली आहे. या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणांतून रब्बीसाठी १, खरिपासाठी १ एक अशी दोन रोटेशन पूर्ण झाली. यामुळे कुकडी प्रकल्पात केवळ १० टक्के एवढा पाणीसाठा दिसत असला तरी वाढती उन्हाची तीव्रता व पाण्याच्या मागणीमुळे यंदा या प्रकल्पातील धरणे कोरडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एप्रिल महिना सुरू होताच खऱ्या अर्थाने उन्हाळ््याची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. पूर्वीप्रमाणे पावसाळाही वेळेवर सुरू होत नसल्याने मार्च ते जुलै या पाच महिन्यांपर्यंत प्रकल्पातील पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे. सध्या या प्रकल्पात असणाऱ्या डिंभेच्या पाण्यावरच सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. डिंभे धरणासह यंदा प्रकल्पातील सर्वच धरणांत जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांत सध्या पाणी शिल्लक नाही. त्यातच प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी दबाव वाढू लागले आहेत. यामुळे पाणलोटाच्या आतील आदिवासी गावांना पाण्याच्या या पळवापळवीचा फटका बसणार आहे. ‘धरणं आमच्या भागात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण,’ याचा पुन्हा एकदा अनुभव धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना यंदा येणार आहे. या भागात असणाऱ्या पाणी योजना अडचणीत येणार असल्याने पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची चिन्हे आहेत.
वडज हे धरण मीना नदीवर बांधण्यात आले आहे. १९८३ पासून या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली. धरणास १४ किमीचा मीना पूरक कालवा व ४० किमीचा मीना शाखा कालवा काढण्यात आला आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता १.२७१ टीएमसीएवढी असून सध्या या धरणात ०.२८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
पिंपळगाव जोगा हे धरण सन २००० मध्ये पूर्ण झाले असले तरी १९९६-९९ पासूनच घळभरणी पूर्ण करून धरणात पाणीसाठा करण्यास सुरुवात केली आहे. या धरणातून ७० किमीचा डावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ७.६८७ टीएमसीएवढी असून या धरणात ० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
येडगाव-कुकडी प्रकल्पात येणारे येडगाव धरण हे महत्त्वाचे धरण असून या धरणाचे बांधकाम सन १९७७ मध्ये पूर्ण झाले. हे धरण पिकअपविअर म्हणून बांधण्यात आले असून डिंभे, माणिकडोह, पिंपळगाव व वडज या धरणांतून या धरणात पाणी सोडण्यात येते. या धरणास २४९ किमी लांबीचा डावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची एकूण साठवणक्षमता ३.३ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात केवळ २५ टक्केएवढा पाणीसाठा आहे.

Web Title: The base reached by the dams of the Kukadi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.