आंतरराष्ट्रीय बाजारात बासमतीला पसंती
By admin | Published: November 11, 2015 01:48 AM2015-11-11T01:48:20+5:302015-11-11T01:48:20+5:30
तांदळाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील ब्रँडेड बासमतीला पसंती मिळत आहे. मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँड बासमतीच्या विक्रीत तिपटीने वाढ झाली आहे
पुणे : तांदळाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील ब्रँडेड बासमतीला पसंती मिळत आहे. मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँड बासमतीच्या विक्रीत तिपटीने वाढ झाली आहे. २०१४-१५ या वर्षात बासमतीची निर्यात २० लाख टनापर्यंत पोहचली आहे.
जगात केवळ भारतातील पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्येच सर्वाधिक बासमती तांदळाचे उत्पादन होते. त्यामुळे जगाला बासमती पुरविणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. भारतातून अमेरिका, आॅस्ट्रेलिया यांसह आखाती देशांमध्ये बासमतीला तांदळाला अधिक मागणी आहे. या देशांमध्ये मागील काही वर्षांत ब्रँडेड बासमती तांदुळाची निर्यात वाढली आहे.
साधारणत: १२२० डॉलर प्रति क्विंटल या दराने भारताला साडेचार अब्ज डॉलरचे परकीय चलन मिळाले. मात्र एप्रिलनंतर सप्टेंबरअखेर नियार्तीत पंचवीस टक्के घट येऊन गेल्या वर्षीच्या तुलनेने १.८० अब्ज डॉलरचे परकीय चलन मिळाले. त्यावेळेस नियार्तीचा दर ९५० डॉलर प्रति क्विंटल एवढा होता.
अॅग्रीकल्चरल अॅन्ड प्रोसेस्ड फुड प्रोडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (अपेडा) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २००९-१० मध्ये भारतातून ९ लाख टन ब्रँडेड बासमती तांदळाची निर्यात झाली होती. पुढील प्रत्येक वर्षी यामध्ये वाढ होत गेली. २०१४-१५ मध्ये हा आकडा २० लाख टनांपर्यंत पोहचला.
सध्याच्या हंगामात ही निर्यात २३ लाख टनांपर्यंत जाईल, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना तांदळाचे व्यापारी राजेश शहा म्हणाले, इराणने मागील वर्षी सुमारे ७० टक्के बासमीत तांदुळ कमी घेतला. त्यामुळे भारतीय बासमती तांदळाला भारतीय बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देऊन त्याचा भारतातच विक्रमी खप वाढवावा, असा अपेडाने निर्णय घेतला होता. त्यासाठी भारतातील ब्रँड बासमती ग्राहकांसाठी एक किलो, पाच किलोचे ब्रँड बासमती तांदळाचे उत्कृष्ट पॅकिंगमध्ये उपलब्ध केले आहे. याला ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याने खप वाढत आहे.