जिवंत झऱ्यांना हवाय ‘हेरिटेज’चा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:39 AM2018-05-15T01:39:58+5:302018-05-15T01:39:58+5:30
दिवसेंदिवस पाण्यासाठी मारामारी होत असताना, दुसरीकडे नैसर्गिक झरे, विहिरी बुजविण्याचे काम केले जात आहे.
- श्रीकिशन काळे
पुणे : दिवसेंदिवस पाण्यासाठी मारामारी होत असताना, दुसरीकडे नैसर्गिक झरे, विहिरी बुजविण्याचे काम केले जात आहे. खरं तर हे झरे, विहिरी नैसर्गिक ठेवा असून, तो कायम जपला पाहिजे. त्यामुळे कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळू शकते. परंतु, हा ठेवाच गायब होत असल्याने त्यांना ‘हेरिटेज’चा दर्जा दिल्यास ते जिवंत राहतील. त्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून महापौर, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे पत्राद्वारे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पण, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना याबद्दल काहीच आस्था दिसत नसल्याने त्यांच्याकडून काहीच पावले उचलली जात नाहीत.
बावधन येथील राम नदीमध्ये अनेक जिवंत झरे व विहिरी आहेत. त्यातील अनेक झरे, विहिरी बुजविण्यात आल्या असून, सध्या ड्रेनेजलाइन टाकण्यात येत आहे. त्यामुळे तर जे जिवंत झरे आहेत, तेदेखील त्याकडे मरून जात आहेत. त्यामुळे राम नदीत येणारे पाणी कमी होत आहे. परिणामी नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. काही दिवसांनंतर ही नदी गायब होईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे झरे वाचविणे गरजेचे बनले आहे. या झºयांना हेरिटेज म्हणून घोषित करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी शैलेश पटेल, गणेश कलापुरे व इतर पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
पटेल म्हणाले, ‘‘नदी ही जीवनदायिनी आहे. पूर्वी तिचे पाणी पिण्यासाठी वापरत असत. परंतु आजची अवस्था खूपच वाईट झाली आहे. पिण्यासाठी तर सोडाच, पण वापरण्यालायकदेखील नाही. ही अवस्था आपणच केली आहे. नदी वाचविण्यापूर्वी अगोदर हे जिवंत झरे, विहिरी वाचविल्या पाहिजेत. कारण जर पाणीच नसेल, तर नदी असून उपयोग काय? नाल्यावर किंवा नदीपात्रावर रस्ता करण्यास मी विरोध करीत नाही. परंतु, नदीच्या किंवा झºयांच्या प्रवाहाला धोका पोहोचू नये. सध्या जमिनीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वत्र बांधकामाला ऊत आला आहे. प्रशासनाने झरे, विहिरी, ओढे यांच्यावर आरक्षण टाकून ते जपावेत आणि त्यांची वेळोवेळी तपासणीही केली पाहिजे.’’
>दरवाजेच होताहेत बंद
राम नदीवरील पुलाखालील अनेक दरवाजेदेखील बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पावसाळ््यात येथून पाणीच जाणार नाही. नदीपात्रात बांधकाम सुरू असल्याने नदीच्या एकेक भागावर घाव घातला जात आहे. छायाचित्रात एक दरवाजा बांधकाम केल्याने बंद झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तेथून पाणी वाहणार कसे ?
>नदीची स्वच्छता नदीचे प्रदूषण याबाबत सरकार एका बाजूला मोठमोठ्या घोषणा करीत आहे. नमामि गंगेसारख्या योजना पंतप्रधान राबवत आहेत. महाराष्ट्रात नमामि चंद्रभागेसारखी योजना मुख्यमंत्री राबवत आहेत; पण या नद्या ज्या छोट्या नद्यांनी ओढ्यांनी आणि जलस्रोतांनी प्रवाहित झाल्या आहेत. ते मूळचे छोटे प्रवाह आज नष्ट केले जात आहेत. नदीच्या योजना करताना पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे. राम नदीतील नैसर्गिक झरे बुजवले जात आहेत. ते संरक्षित केले पाहिजेत. त्यासाठी नागरिकांनीच पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
- गणेश कलापुरे, पर्यावरणप्रेमी, औंध-बावधन
>झºयातून दररोज एक लाख लिटर पाणी
राम नदी भुकूमजवळील डोंगरातून उगम पावते. तेथून बावधन-पाषाण-बाणेर भागातून पुणे शहरातील मुळा नदीला मिळते. सुमारे १८ किलोमीटरचा ती प्रवास करते. ही नदी वाचविण्यासाठी इंदू गुप्ता, सारंग यादवडकर, उपेंद्र धोंडे आदींनी लढा दिला आहे व देत आहेत. राम नदीमध्ये सुमारे १७ झरे शोधले आहेत. परंतु, त्यातील अनेक झरे बुजले गेले आहेत. येथील झरा दिवसाला एक लाख लिटर स्वच्छ पाणी देते.
>नैसर्गिक पाण्याचे स्रोत आरक्षित व्हावेत
राज्य सरकारकडून मैदाने, क्रीडांगण, रुग्णालय आदींसाठी जागा आरक्षित केली जाते. कारण या आवश्यक गोष्टी आहेत. परंतु, पाणी तर सर्वात आवश्यक गोष्ट आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे जे जिवंत झरे, विहिरी आहेत, त्यांना जिवंत ठेवण्यासाठी तेदेखील आरक्षित केले पाहिजेत, तरच ते जिवंत राहतील. ज्यांच्या जागेत हे झरे, विहिरी असतील, त्यांना योग्य मोबदला देऊन ते जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे शैलेश पटेल यांनी सांगितले.
>गुजरात सरकारमध्ये नदीबाबत जागरूकता
नैसर्गिक पाण्याचे झरे, विहिरी आरक्षित व्हावे, यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान, जलसंपदा विभाग यांना पत्र पाठविले आहे. अद्याप त्यांच्याकडून काही उत्तर आलेले नाही. गुजरात मुख्यमंत्र्यांना एका नदीविषयी मी पत्र पाठवले होते, तर त्यांनी मला संपर्क साधून त्या नदीविषयी काही प्रकल्प करता येईल का? असे विचारले आणि किती निधी लागेल, तेदेखील विचारले. गुजरात सरकारकडून त्वरित प्रतिसाद मिळाला, पण आपल्या महापौरांनी स्थानिक झरे, विहिरी यांबाबत काहीच उत्तर दिलेले नाही याची खंत वाटते, असे पटेल म्हणाले.
>झºयाचे संवर्धन
करू : महापौर
या संदर्भात महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘बावधन झºयाबाबत आम्ही तेथील पाण्याची पातळी तपासणार आहोत. त्यानंतर झºयाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’