भाजीविक्रेत्यांचा जुन्नर पालिकेसमोर टोपली मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:11 AM2021-03-06T04:11:40+5:302021-03-06T04:11:40+5:30
जुन्नर : धान्यबाजार, शंकरपुरा येथील रस्त्यावर तसेच एसटी बसस्थानक व बाजार समितीलगत असणाऱ्या रस्त्यालगतच्या पदपथावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यावर ...
जुन्नर : धान्यबाजार, शंकरपुरा येथील रस्त्यावर तसेच एसटी बसस्थानक व बाजार समितीलगत असणाऱ्या रस्त्यालगतच्या पदपथावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यावर जुन्नर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर संतप्त झालेल्या या भाजीविक्रेत्यांनी थेट नगरपालिकेवर टोपली मोर्चा काढला व नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच्या चौकात टोपल्या मांडून बैठक मारत निदर्शने केली. या निदर्शनांमुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागला.
जुन्नर नगरपालिकेच्या महात्मा फुले भाजी मंडईत काही गाळ्यांचे लिलाव झाले आहेत. तसेच काही शिल्लक आहेत. गाळे घेताना मंडईत त्याच ठिकाणी बसण्याचे बंधन, अनामत रक्कम भरण्याच बंधन आहे. तर रस्त्यावर बसणारे विक्रेत्यामुळे नागरिक खरेदीसाठी मंडईत येत नाही. यामुळे गाळेधारक व रस्त्यावरील विक्रेते यांच्यात संघर्ष आहे. परिणामी गाळेधारक पण व्यवसायासाठी रस्त्यावर बसतात. तर बाजार समितीच्या जागेत बसणारे विक्रेते आता थेट पदपथावर बसत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव व नागरिकांच्या मागणीवरून नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात बाजार समितीच्या लगत असणाऱ्या पदपथावर बसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करत बसण्यास मज्जाव केला. परिणामी या विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर धरणे धरली तसेच विरोधात घोषणा दिल्या. जवळपास एक तास ठिय्या मारलेल्या विक्रेत्यांनी नगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी खाली येऊन चर्चा करण्याची मागणी केली . त्यानंतर मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी विक्रेत्याच्या प्रतिनिधीशी चर्चा केली.
नगरपालिकेने रस्त्यावर बसण्यास मज्जाव केल्याने या विक्रेत्यांनी बाजार समितीच्या जागेत दुकाने लावली आहेत. तर धान्यबाजारातील फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने लावलीच नाही. यातील बरेचसे विक्रेते हे कोरोना संकटाच्या काळात रोजगार गमावल्याने भाजीपाला विक्री व्यवसायात उतरले आहेत. तसेच परिसरातील गावातून शेतकरीदेखील मालविक्रीसाठी रस्त्यावर बसतात. त्यांच्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
०५ जुन्नर
जुन्नर नगरपालिकेवर भाजी विक्रेत्यांनी काढलेला टोपली मोर्चा.