अग्निशमन दलाच्या जवानाला वटवाघूळाचा चावा ; कुठली लस द्यायची याबाबत डाॅक्टरही संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 12:42 PM2019-12-03T12:42:14+5:302019-12-03T12:46:08+5:30
वटवाघूळाची सुटका करताना त्याने चावा घेतल्याने अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला आहे.
पुणे : मांज्यामध्ये अडकलेल्या वटवाघूळाची सुटका करताना वटवाघूळाने अग्निशमन दलाच्या जवानाला चावा घेतल्याची घटना पुण्यात घडली आहे. कमलेश चाैधरी असे त्या जवानाचे नाव आहे. वटवाघूळासाठी कुठलिही लस अद्याप नसल्याने डाॅक्टरांनी रेबीजची लस जवानाला दिली. तसेच घाबरण्याचे कुठलेही कारण नसल्याचेही डाॅक्टरांनी स्पष्ट केली. दरम्यान अशी घटना घडल्यास एखादी लस असावी अशी अपेक्षा जवानाने व्यक्त केली आहे.
साेमवारी संध्याकळी कसबा अग्निशमन दलाला एका व्यक्तीने वटवाघूळ मांज्यामध्ये अडकल्याची माहिती दिली. तातडीने कसबा अग्निशमन दलाचे जवान कमलेश चाैधरी घटनास्थळी गेले. बांबूच्या सहाय्याने त्यांनी वटवाघूळाला झाडावरुन खाली उतरवले. वटवाघूळाला संपूर्ण मांंजा अडकला हाेता. चाैधरी हे मांजातून वटवाघूळाची सुटका करत असताना त्याने त्यांना नखे मारली. तसेच हाताच्या बाेटाचा चावा देखील घेतला. चाैधरी यांनी त्या वटवाघूळाची मांज्यातून सुखरुप सुटका केली. त्यानंतर ते कमला नेहरु हाॅस्पिटलमध्ये गेले असता वटवाघूळाच्या चाव्याची पहिलीच केस असल्याने त्यासाठीची कुठलिही लस उपलब्ध नव्हती. डाॅक्टरांनी रेबीजच्या लसीचा काेर्स करण्यास चाैधरी यांना सांगितले आहे. तसेच घाबरण्याचे कुठलेही कारण नसल्याचे देखील स्पष्ट केले.
चाैधरी म्हणाले, मांज्यातून सुटका करत असताना वटवाघूळाने बाेटाचा चावा घेतला. तसेच त्याच्या नखांनी वार देखील केले. वटवाघूळ चावण्याची पहिलीच केस असल्याने त्यावर अजून कुठलिही लस उपलब्ध नव्हती. सध्या रेबीजच्या लसीचा काेर्स करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. भविष्यात अशी एखादी घटना घडली तर एखादी लस असावी अशी माझी अपेक्षा आहे.
दरम्यान आग विझवणे हे अग्निशमन दलाचे मुख्य काम असताना त्यांनी नेहमीच इतर कामे करावी लागत असल्याचे चित्र आहे. वास्तविकतः पक्षांची सुटका करणे किंवा इतर कामे ही अग्निशमन दलाची नसताना एक सामाजिक भान ठेवून जवान ही कामे करत असतात.