नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 03:35 PM2024-07-06T15:35:02+5:302024-07-06T15:38:16+5:30

माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला...

Bathing the feet of Mauli in chants of 'Gyanba-Tukaram' | नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात

नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात

- भरत निगडे

नीरा (पुणे) :  

नीरा भिवरा पडता दृष्टी ! 
स्नान करिता शुद्ध सृष्टी! 
अंती तो वैकुंठप्राप्ती ! 
ऐसे परमेष्ठी बोलिला !! 

'ग्यानबा-तुकाराम' नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज शनिवारी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला.

पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी साडेआठ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावा घेतला. पिंपरे व पिसुर्टी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक बेसन - भाकरी, वेगवेगळ्या चटण्या, खरडा, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला.

नीरा नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माऊलींचा पालखी सोहळा अकरा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर पालखी सोहळ्याचे स्वागत आमदार संजय जगताप, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक जितेंद्र निगडे, माजी सभापती लक्ष्मणराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संदीप धायगुडे, प्रमोद काकडे, राधा माने, अनंता शिंदे, अभिषेक भालेराव, अनिल चव्हाण, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे, बाबूराव दगडे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. साडेअकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदीच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला. 

माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पालखी तळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगालावुन माऊलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. उन्हाची ताव्रता नसली तरी दमट वातावरण असल्याने वारकरी व भाविक घामाने ओलेचिंब झाले होते. यावर्षी ग्रामपंचायतीने दर्शन रांगेवर मंडप टाकून सावली केली होती. पालखीतळ परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.  

माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सीमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर स्नान घातले जाते. दुपरचे भोजन आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला.

Web Title: Bathing the feet of Mauli in chants of 'Gyanba-Tukaram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.