अंघोळीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; मित्राच्या पत्नीवर बलात्कार, ब्लॅकमेल करत पैसेही उकळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 11:39 AM2022-12-13T11:39:51+5:302022-12-13T11:39:58+5:30
मित्राला राहायला जागा नव्हती म्हणून स्वतःच्या घरात काही दिवसासाठी त्याला ठेवून घेतले
पुणे/किरण शिंदे : गावाकडील मित्र म्हणून त्याला पुण्यात आणले. पुण्यात एका ठिकाणी नोकरीही मिळवून दिली. राहायला जागा नव्हती म्हणून स्वतःच्या घरात काही दिवसासाठी त्याला ठेवून घेतले. मात्र याचा त्याने गैरफायदा घेतला. मित्राची पत्नी अंघोळ करत असताना लपून त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला. इतकेच नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत पैसेही उकळले. 27 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार या महिलेच्या पतीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला आणि तिचा पती लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. या महिलेचा पती वाघोली परिसरातील एका खाजगी कंपनीत काम करतो. वाघोली परिसरातच ते भाड्याच्या घरात राहतात. या महिलेच्या पतीने गावाकडच्या मित्राला काम मिळवून देण्यासाठी पुण्यात आणले होते. एका पेट्रोल पंपावर त्याला नोकरी देखील मिळाली होती.. मात्र राहण्यासाठी जागा नसल्याने त्याला स्वतःच्या घरात ठेवून घेतले. मात्र आरोपी तरुणाने याचा गैरफायदा घेतला.
मित्र कामाला गेल्यानंतर फिर्यादी आंघोळ करत असताना त्याने नकळत त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादी सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. सुरवातीला फिर्यादीने भावाकडून इमर्जन्सी कारण सांगत पन्नास हजार रुपये घेऊन आरोपीला दिले. मात्र त्यानंतरही आरोपीने आणखी साडेतीन लाख रुपये दे अन्यथा बदनामी करेल अशी धमकी दिली.
या सर्वाला कंटाळून फिर्यादीने भावाला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर भावाने आरोपीला समजावूनही सांगितले. परंतु तो आणखी पैशाची मागणी करत पिडीतेला त्रास देऊ लागला. अखेर दोघांनी मिळून पतीला हा सर्व प्रकार सांगितला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे अधिक तपास करत आहेत.