ऐन गणेशोत्सवात बत्ती गुल! देहूत महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 02:15 PM2022-09-03T14:15:09+5:302022-09-03T14:15:44+5:30
पोलीस यंत्रणा तत्काळ दाखल झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही...
देहूगाव (पुणे) : येथील माऊली सोसायटी, भीमाशंकर सोसायटी या भागातील सुमारे अडीचशे ते तीनशे कुटुंब ऐन गणेशोत्सवात अंधारात गेल्याने संतप्त नागरिकांनी महावितरणच्या देहू येथील विभागीय कार्य़ालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. मोर्चात महावितरणच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मात्र पोलीस यंत्रणा तत्काळ दाखल झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
येथील कार्यालयात कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी या निवेदन घेण्यासाठी उपलब्ध नव्हता. शेवटी देहूरोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक वर्षाराणी पाटील यांनी निगडी येथील विभागीय अधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क करून परिस्थितीची जाणीव करून देऊन तात्काळ घटनास्थळी येण्यास सांगितले. या फोनाफोनीमध्ये दोन तास नागरिकांना ऐन गौरी अवाहनाच्या दिवशीची रस्त्यावर ठाण मांडावे लागले.
माऊली सोसायटी व सदगुरू सोसायटीमध्ये गेल्या दोन वर्षापासून लाईट वारंवार जाणे, होलटेज कमी असणे हा तक्रारी आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार लाईट जात आहे. याबाबत येथील कार्य़ालयात लेखी तक्रारी दाखल केल्या निवेदने दिली.
यावेळी देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, बांधकाम सभापती योगेश काळोखे, माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे, यांच्यासह विनोद जोशी, अनील काळे, शरद पवार, रमेश डोंगरे, मुरलीधर तायडे, ज्योती तायडे, सविता पंडीत, मनिषा चौधरी, मारुती पाटील, सुरेंद्र शर्मा, सुरेश गावडे, कल्पना पिसाळ, देवा गिरी यांच्यासह या सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होता.
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांच्याकडे नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी निवेदन दिले. यानंतर महावितरणे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांनी या सोसायटीत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या भागात सध्या नगरपंतायतीच्या वतीने केबल टाकून देण्यात येणार आहे व महावितरण केवळ कैबल जोडून देणार असल्याची माहिती बांधकाम सभापती योगेश काळोखे यांनी सांगितले.
या भागात नवीन घरे वाढलेले आहेत. मोठ्या प्रमाणात वीजपंप आहेत. ते सुरू केल्यानंतर विद्यूत वाहिन्यांवर लोड येऊन शॉट होतात. या भागात लोड पुर्वी ईतकाच आहे. त्यामुळे ही समस्या येत आहे. या भागात सध्या तातडीने उपलब्ध केबल टाकून विद्यूत पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे सांगितले.
-मिलिंद चौधरी अतिरिक्त कार्य़कारी अभियंता