पुणे-नाशिक महामार्ग कामाच्या मंजुरीच्या श्रेयवादाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:29 AM2020-12-11T04:29:14+5:302020-12-11T04:29:14+5:30
चाकण : पुणे ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील चाकणमधील वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या प्रवाशी नागरिकांसह वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला ...
चाकण : पुणे ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील चाकणमधील वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या प्रवाशी नागरिकांसह वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.कारण लवकरच इंद्रायणी नदीपासून ते राजगुरूनगरपर्यंत दरम्यानच्या रस्त्याचे सहापदरीकरणासह चाकण येथे उड्डाण पूलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रत्यक्ष रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.मात्र सेना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कामाच्या श्रेयवादावरून सोशल मीडियावर मोठी स्पर्धा सुरू आहे.
चाकण शहरासह परिसरातील वाढती लोकसंख्या,वेगाने वाढणारी कारखानदारी,अपुरे पडणारे रस्ते,चौकाच्या चारही बाजूंनी असणारे अवैध बस थांबे,तसेच सर्वसामान्याना भंडावून सोडणारे रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण,चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाणपूल तसेच उद्योगाची पंढरी समजल्या जाणार्या छोट्या मोठ्या कारखान्यामूळे येथील पुणे नाशिक मार्गावरील आळंदी फाटा, स्पाईसर चौक,तळेगाव चौक,आंबेठाण चौक,तसेच तळेगाव - चाकण - शिक्रापूर या महामार्गावरील म्हाळुंगे, खराबवाडी, माणिक चौक या ठिकाणी सतत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे चाकणकरांसह उद्योजकांचा गुदमरलेला श्वास लवकरच मोकळा होणार आहे.
चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाण पुलासह रस्ता रुंदीकरण करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे.तसा हा प्रश्न लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरल्याने मतदारांनी विद्यमान खासदारांना नाकारत नवीन चेहऱ्याला काम करण्याची संधी दिली.हे काम मार्गी लावण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात सध्या सोशल मीडियावर श्रेयवादाची मोठी स्पर्धा सुरू झाली आहे.तर भाजपने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मंजुरी दिल्याने आमच्यामुळेच या कामाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगत श्रेयवादात उडी घेतली आहे.परंतु यांच्या नुसत्या श्रेयाने लगेच हा प्रश्न सुटलेला नाही.ज्यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने चाकणच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला असे म्हणावे लागेल. तोपर्यंत तरी रोजच्या वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.
पुणे नाशिक महामार्गावरील खेड टोल नाका ते मोशी टोल नाका या १७.७७ किलोमीटर लांबीच्या ६५० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महामार्गावरील भूसंपादनातील वाढत्या अडचणी लक्षात घेता ४५ मीटर महामार्गाची रुंदी असणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड ठेवण्यात येणार असून, चाकण या ठिकाणी २.२५ किमी लांबीचा मोठा उड्डाणपूल तसेच ७ व्हेईकल अंडरपास व २ ठिकाणी ओव्हरपास करण्यात येणार आहे.