पुराशी झुंजत महावितरण कर्मचाऱ्यांनी सुरु केला वीज पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 08:25 PM2019-08-06T20:25:28+5:302019-08-06T20:26:42+5:30
पूरस्थितीमुळे रिहे खोऱ्यांतील गावांचा पौड व पिरंगुट गावांशी संपर्क तुटला होता. दुर्गम भागात असलेल्या या गावांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत होते.
पुणे : मुळशी धरणातून मुळा नदीत तब्बल ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन रोहित्राचा विद्युत पुरवठा सुरु करण्याची धाडसी कामगिरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली. तसेच, त्या मुळे खंडीत झालेल्या दहा गावांचा वीज पुरवठा देखील सुरळीत केला.
मुळशी धरणात ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे मुळशी तालुक्यातील घोटावडे पुलाजवळ असलेले रोहित्र पुराच्या पाण्यात बुडाल्याने पुढील धोका टाळण्यासाठी रिहे २२ केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा महावितरणकडून रविवारी (दि. ४) दुपारी बंद करण्यात आला. परिणामी रिहे खोऱ्यामधील रिहे, शेळकेवाडी, घोटावडे, जवळ, कातरखडक, खांबवळी, पिंपोळीसह १० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.
पूरस्थितीमुळे रिहे खोऱ्यातील गावांचा पौड व पिरंगुट गावांशी संपर्क तुटला होता. दुर्गम भागात असलेल्या या गावांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे मुळशी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, सहाय्यक अभियंता बी. एस. वावरे व सहकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्थेतून या दहा गावांना वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र नदीच्या पुरामध्ये बुडालेल्या रोहित्राचा वीजपुरवठा मुख्य वीजवाहिनीपासून खंडित करणे व संभाव्य धोके टाळणे अतिशय आवश्यक होते. त्या शिवाय या गावांचा विद्युत पुरवठा करणे शक्य नव्हते.
रविवारी सायंकाळी महावितरणकडून मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहकायार्साठी तहसीलदार अभय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार बोटीने जाऊन रोहित्राचा मुख्य वीजवाहिनीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आखण्यात आली. सोमवारी (दि. ५) सकाळी दहा वाजता आपत्ती व्यवस्थापनाचे पथक बोटीसह सज्ज झाले. मुळा नदीत प्रवाहाच्या उलट्या दिशेला रोहित्र असल्याने ही मोहीम खडतर होती. मात्र महावितरणचे जनमित्र राहुल मालपोटे व शुभम ढिले यांनी हे आव्हान स्विकारले. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमसोबत बोटीने या दोघांनी सुमारे पाऊण किलोमीटर अंतर कापले. मुसळधार पावसातच मालपोटे यांनी रोहित्राच्या खांबावर चढून मुख्य वीजवाहिनीपासून वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दहा गावांचा विद्युत पुरवठा अन्य वाहिनीवरुन सुरु केला. अवघ्या चोवीस तासांत रिहे खोऱ्यातील गावांमधे वीज आली.
आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकातील प्रमोद बलकवडे, ओंकार बलकवडे, सनी शिर्के, नागेश धनवे, गौरव धनवे, शुभम धनवे, विष्णू गोडांबे, अमोल खानेकर, भरत गुप्ता यांनी मोहीमेला सहाय्य केले.