बैलगाडा शर्यतीवरून श्रेयाची लढाई
By admin | Published: April 10, 2017 01:46 AM2017-04-10T01:46:15+5:302017-04-10T01:46:15+5:30
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यानंतर या यशाचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाची
पिंपळवंडी : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यानंतर या यशाचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाची लढाई सध्या जोरात सुरू असून, या श्रेयवादाच्या लढाईत बाजी कोण मारणार, हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. सध्या सोशल मीडियावरून याचे श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड या तीन तालुक्यांत जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या बैलगाडाशर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती. या बंदीमुळे ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यामुळे बैलगाडा शौकीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. इतकेच नाही तर ग्रामीण भागातील जत्रांवरही याचा परिणाम दिसून आला. या बंदीमुळे जत्रांमध्ये होणारी आर्थिक उलाढाल मंदावली. आपल्या पोटच्या मुलापेक्षाही बैलांना जिवापाड जपणारा शेतकरी या निर्णयामुळे खचला. कारण लाखो रुपये किमतीचे बैल काही हजार रुपयांमध्ये विकण्याची वेळ त्यांच्यावर आली.
सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकरणात लक्ष घातले. बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली तसेच लोकसभेत बैलगाडा शर्यतीवर बंदी उठविण्याची मागणी केली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही बैलगाडामालक संघटनेच्या माध्यमातून वारंवार बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा केला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही पाठपुरावा सुरु करत आपले संपूर्ण वर्चस्व पणाला लावले.
राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल करून ते विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडले. या विधेयकास दोन्हीही सभागृहातील विरोधी पक्षांनीही विरोध न करता मंजुरी देऊन बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेतले. (वार्ताहर)
शर्यत सुरू होणार हेच महत्त्वाचे
बैलगाडा शर्यत सुरू करण्याचे श्रेय कुणीही घ्या; बैलगाडा शर्यत सुरू होणार हे चांगलं झालं, अशी बोलकी प्रतिक्रिया एका बैलगाडामालकाने दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलगाडा शर्यत सुरू झाली हे महत्त्वाचे आहे. राजकीय नेते मात्र श्रेयवादातच अडकलेले दिसून येत आहे.