काशिनाथाचं 'चांगभल'च्या गजरात बावधनचे बगाड उत्साहात संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 09:00 PM2024-03-30T21:00:59+5:302024-03-30T21:02:20+5:30
राज्यातून लाखो भाविकांची बगाड उत्सवास उपस्थिती
बावधन : संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा रविवारी ‘काशीनाथाचं चांगभलं’ च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. खासदार उदयनराजे भोसले यांनी दरवर्षी प्रमाणे बगाडास भेट देऊन पूजन केले.
बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर याठिकाणी सकाळी साडे आठच्या सुमारास पोहचले. त्यानंतर बगाड्या विकास नवले यांना कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची पूजा-आरती करण्यात आली. बगाड्याला वाजत गाजत बगाडाजवळ नेण्यात येवून त्याला पारंपरिक पध्दतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले.
बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी अकराच्या सुमारास सुरूवात झाली. त्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. बगाड वाई-पाचवड रस्त्यावर बावधन फाटयावर पाचच्या सुमारास पोहचले. तेथे रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, मिठाई, खेळणी, थंडपेयांची व फळांची दुकाने, रसाची गुर्हाळे, देवांच्या फ्रेमची, कटलरीची दुकाने थाटण्यात आली होती. वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला व दर्शन घेतले.
बगाड गाड्यास शेतातून जाताना एका वेळी १२ बैल जुंपले जात होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर ४ बैल जुंपून बगाड ओढण्यात आले. ग्रामस्थांनी बगाडासाठी बैल धष्टपुष्ट केले होते. गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या. बगाड परिसरात मुंबईच्या व स्थानिक विविध संस्था, मंडळांनी भाविकांच्या सोईसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक व १०८ अँम्ब्युलन्स पथके तैनात करण्यात आली होती. वाई विभागाचे महावितरणचे अधिकारी आपल्या टीम समवेत जातीने लक्ष ठेवून हजर होते. वाई नगरपरिषदेचे अग्निशमक बंब बावधन हायस्कूल येथे सज्ज ठेवण्यात आले होते. सायंकाळी उशिरा बगाड गावात पोहचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला.
बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाडयाच्या पुढे व पाठीमागे ट्रॅक्टरवर लाउडस्पीकरची सोय करून यात्रा कमिटी व प्रतिष्ठीत ग्रामस्थ आदी मान्यवर ध्वनिक्षेपकावरून बगाडाबाबत सुचना देत होते. अनेक भाविकांनी दिलेल्या देगण्यांचा पुकारा यावेळी करण्यात येत होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भाविकांनाही सुचना देण्यात येत होत्या. डीवायएसपी बाळासाहेब भालचिम,वाईचे पोलीस निरीक्षक अर्जुन शहाणे, भुईजचे सहा पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आदीनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. वाहतुकीसह यात्रेत गोंधळ होणार नाही याकडे पोलीस लक्ष ठेवून होते. काही किरकोळ प्रकार वगळता बगाड यात्रा शांततेत व सुरळीत पार पडली.
खिलारी बैलजोड्या पाहण्यास गर्दी
शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्षभर आपल्या बैलांची निगा राखून त्यांना खुराक देवून तयार केलेले असते. हे खिलारी बैल पाहण्यासाठी शेतकरी लोक लांबून येतात. त्यामुळे बगाड आणि बैलजोडी याबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता असते. कोणत्या शेतकऱ्यांनी बैलाची कशी काळजी घेतली आहे. हे या बगाड्याच्या दरम्यान शौकीनांना समजून येते. त्यामुळे बगाडासह बैलजोडी पाहण्यासही गर्दी होत असते.