विद्यापीठात ‘बीबीए इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोग्राम’ अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:31+5:302021-09-09T04:15:31+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संचेती हेल्थकेअर अकॅडमी यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्याअंतर्गत विद्यापीठात लवकरच ‘बीबीए ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संचेती हेल्थकेअर अकॅडमी यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्याअंतर्गत विद्यापीठात लवकरच ‘बीबीए इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोग्राम’ हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
बुधवारी या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, ‘स्कूल ऑफ इंटरडीसिप्लिनरी सायन्सेस’चे संचालक डॉ. अविनाश कुंभार, संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. पराग संचेती उपस्थित होते.
या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानुसार अद्ययावत व व्यवस्थापनाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाची संधीही मिळणार आहे. या शैक्षणिक वर्षापासूनच या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जाणार असून लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रमाची माहिती जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
--------------
आरोग्य क्षेत्रात चांगले व्यवस्थापन असणे ही काळाची गरज झाली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्राशी निगडित कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-------