सावधान ! विरुद्ध दिशेने येताय तर गाडी पंक्चर होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 09:14 PM2018-03-30T21:14:55+5:302018-03-30T21:14:55+5:30
पुण्यात "या" विरुदध दिशेने वाहन चालवत असाल तर विचार करा ! नाहीतर या समस्येला तोंड द्यावं लागेल.
पुणे : उलट दिशेने वाहन चालवून अनेक अपघात झाल्याचे आपण बघितले आहे. त्यामुळे अनेक निष्पाप प्राणाला मुकले आहेत तर काही कायमचे जायबंदी झाले आहेत. पण समस्येवर उपाय म्हणून पुण्यातील ऍमेनोरा पार्क सिटीत एक आगळावेगळा प्रयोग राबवण्यात आला आहे. त्यात विरुद्ध दिशेने येणारी वाहने थेट पंक्चर होतील अशा पद्धतीचा गतिरोधक लावल्याने नियमांना बगल देणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच चाप बसला आहे. याबाबतचा व्हिडीओ शुक्रवारी समाजमाध्यमात व्हायरलही झाला आहे. पुण्यात असणाऱ्या ऍमेनोरा सिटीत वाहने चालकांना अनेकदा विरुद्ध दिशेने वाहन न चालविण्याच्या सूचना सिटी प्रशासनाच्यामार्फत देण्यात येत होत्या. त्यातही शाळा किंवा बागबगीचे असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी फलकही लावण्यात आले होते. मात्र तरीही काही हट्टी चालक नियम पाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर प्रशासनाने शक्कल लढवत नेहमी बसविण्यात येणाऱ्या रम्बलर स्पीडब्रेकरला धारदार लोखंडी आरे असलेली पट्टी लावली. त्यामुळे योग्य दिशेने येणाऱ्या गाड्या सुरळीत येऊ शकल्या तरी उलट दिशेने जाणाऱ्या गाड्या मात्र तात्काळ पंक्चर व्हायला लागल्या. या उपायामुळे बेशिस्त वाहनचालक जागेवर आले असून विरुद्ध दिशेने गाडी चालवण्याचे प्रमाण जवळपास घटले आहे.
याबाबत सिटी ग्रुपचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी बोलताना लोकांना वारंवार सूचना देऊनही फरक पडत नसल्याचा अनुभव सांगितला. त्यामुळे अखेर हा प्रयोग शिस्त लावण्यासाठी नाही तर लोकांचे प्राण वाचविण्यासाठी राबवण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील वाढत्या लोकसंख्येपुढे पोलीस यंत्रणा अनेकदा अपुरी पडते. अशा वेळी त्यामुळे शाळांसमोर किंवा लहान मोठ्या गल्ल्या असलेल्या ठिकाणी हा प्रयोग राबवता येऊ शकतो असेही त्यांनी सुचवले.