सावधान! लोन अँपवरून कर्ज घेताय; पुण्यात गेल्या ५ महिन्यात हजारांहून अधिक लोकांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 10:04 AM2022-05-20T10:04:20+5:302022-05-20T10:04:33+5:30
विवेक भुसे पुणे : अल्पावधीत ५ हजारांपर्यंतचे कर्ज मिळेल, असे संदेश पाहून अनेकजण लोन ॲप डाऊनलोड करतात. खरोखरच त्यांच्या ...
विवेक भुसे
पुणे : अल्पावधीत ५ हजारांपर्यंतचे कर्ज मिळेल, असे संदेश पाहून अनेकजण लोन ॲप डाऊनलोड करतात. खरोखरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. कर्ज मिळाले म्हणून त्यांना सुरूवातीला आनंद होतो. पण, तेथूनच त्यांची फरपट सुरू होते. सात दिवसात हे पैसे फेडायचे असतात. मात्र, सहाव्या दिवसांपासून त्यांचा पैसे मागण्याचा सिलसिला सुरू होतो. तुम्ही पैसे परत केले तरी ते आणखी पैसे मागत राहतात. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तुमचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठविले जातात. तुम्ही आणखी पैसे दिले तरी त्यांची मागणी थांबत नाही. तुम्ही एका सापळ्यात अडकत जाता. पुण्यात गेल्या ५ महिन्यांत अशाप्रकारे किमान एक हजारांहून अधिक लोकांची फसवणूक तर झालीच आहे, शिवाय त्यांची नातेवाईकांमध्ये कधीही भरून न येणारी बदनामीही झाली आहे.
सध्या किरकोळ रकमेचे ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अनेक जाहिराती सोशल मीडियावर येत असतात. याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये लोन ॲपवरून फसवणूक झाल्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत. प्रामुख्याने लोकांनी अशा कोणत्याही अनोळखी ॲप डाऊनलोड करू नयेत. त्यांना तुमचा मोबाईल क्रमांक, फोन गॅलरीचा एक्सेस देऊ नये. असे कर्ज हे प्रामुख्याने फसवणूक करण्यासाठीच दिले जात असते. तुम्हाला कर्ज हवेच असेल तर रजिस्टर संस्था, बँका, पतसंस्थांमधून घ्यावे.
उत्तर भारतात ठिकठिकाणी फसवणुकीची ‘जमतारा’ केंद्रे
हे लोन ॲप चालविणारे प्रामुख्याने उत्तर भारतातील सायबर चोरटे असून, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात येथून ते ऑपरेट करत आहेत. यातील कर्जाची रक्कम आणि फसवणूक केल्याची रक्कम अन्य आर्थिक सायबर गुन्ह्यांपेक्षा अतिशय कमी असते. मात्र, त्यात बदनामी मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यातील गंभीर गुन्हे दाखल करून ते संबंधित पोलीस ठाण्यांत वर्ग करत असल्याचे डी. एस. हाके यांनी सांगितले.
...अशी होते फसवणूक
लोन ॲप डाऊनलोड केल्यावर तुमच्या मोबाइलमध्ये असलेली कॉन्टॅक्ट लिस्ट (सेव्ह केलेले नंबर) नंबर, गॅलरीचा ॲक्सेस त्यांच्याकडे जातो. ॲप डाऊनलोड झाल्यावर त्यावर क्लिक केल्यावर तुमच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे पर्याय येतात. तुम्ही एकावर क्लिक केले तरी त्यांच्याकडून सहाही कंपन्यांकडून तुम्हाला काही सूचना येतात. त्यात हे पैसे ७ दिवसांत परत करण्यास सांगितलेले असते. तुम्ही होय म्हटल्यावर काही वेळातच तुमच्या बँक खात्यात पैसे येतात. तुम्ही २ हजार रुपयांचे कर्ज मागितले असेल, तर त्यातून ते अगोदरच ८०० रुपये कापून १२०० रुपये खात्यात जमा करतात. पटकन कर्ज मिळाल्याचा आनंद सहा दिवसच टिकतो. सहाव्या दिवशी त्यांचा मेसेज येतो. उद्या आमचे ॲप बंद असणार आहे, त्यामुळे तुम्ही आजच पैसे जमा करा, असे त्यात सांगितले जाते. त्यानंतर वारंवार फोन, व्हिडिओ कॉल केले जाऊन पैशांची मागणी केली जाते. तेव्हा वैतागून तुम्ही पैसे भरता; पण ते तेथेच थांबत नाही. तुमच्याकडे आणखी पैशांची मागणी केली जाते. तुमच्या कॉन्ट्रक्ट लिस्टमध्ये असलेल्या तुमच्या जवळच्या लोकांना घाणेरडे मेसेज जातात. तुम्ही पाठविलेल्या आधार कार्ड व डीपीवरील फोटो, तसेच गॅलरीमधील फोटोचा वापर करतात.
जवळच्या नातेवाइकांनाही धमकावले जाते
...हा कर्ज घेऊन पळून गेला आहे. त्याचा मोबाइल हॅक केल्यावर त्यात तुमचा नंबर मिळाला. तुम्ही त्याला पेमेंट करायला सांगा. नाही तर तुम्हाला असे सारखे मेसेज येतील, असे जवळच्या नातेवाइकांना कळवून धमकावले जाते. त्यानंतर व्हिडिओ कॉल केले जातात. त्यावर अश्लील शिवीगाळ केली जाते. कर्ज घेणाऱ्याचे फोटो मॉर्फ करून ते नग्न फोटो जवळच्या नातेवाइकांना पाठविले जातात. त्यामुळे तुमचे नातेवाईक तुम्हाला फोन करून सांगतात. काही जण शिवीगाळ करून त्यांना काय त्रास झाला ते सांगतात. त्यातून तुमची सर्व नातेवाइकांमध्ये बदनामी होते. तुम्ही त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे भरत जातात.
...हे करू नये
- कोणत्याही अनोळखी ऑनलाइन कर्ज देणारे ॲप डाऊनलोड करू नका.
- नेहमी रजिस्टर्ड संस्था, बँका, पतसंस्थांकडूनच कर्ज घ्यावे.
- कोणालाही तुमच्या मोबाइलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरीचा ॲक्सेस देऊ नका.
- असे ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲपमधून किरकोळ रक्कम मिळत असते. फसवणुकीसाठीच ते असे कर्ज देत असतात, हे लक्षात ठेवावे.