सावधान! क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती सांगितल्यास गमवावे लागतात लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 01:41 PM2021-05-20T13:41:53+5:302021-05-20T13:41:59+5:30
क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन केली १ लाख ३७ हजारांची फसवणूक
पुणे: पोलिसांकडून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती न देण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु नागरिक आंधळेपणाने फोनवर कार्डबद्दल सर्वच काही सांगत आहेत. अशा प्रकारच्या एका घटनेत आर बी एल कंपनीच्या क्रेडीट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून गोपनीय माहिती घेतली. त्याद्वारे एकाची १ लाख ३७ हजार २३८ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रत्नाकर सुभाष कोकीळ (वय ४५, रा. डी. एस. के. विश्व, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.
कोकीळ हे २६ जानेवारीला घरात असताना त्यांना आर बी एल कंपनीचे क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे एकाने सांगितले. त्यांना नवीन क्रेडिट कार्डचे अॅक्टिवेशन, रिवार्ड पॉईट लिमिट वाढवणे व जुन्या कार्डावरील रिवार्ड पॉईट वापरण्यास मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडील सर्व कार्डांची माहिती घेतली. त्यानंतर कंपनीतून केलेले प्रोसेसचा कोड नंबर देण्यास सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून मोबाईलवर आलेले सर्व मेसेजमधील कोडनंबर विचारुन घेतले. फिर्यादी यांच्याकडील आर बी एल कंपनीचे क्रेडिट कार्ड, नवीन आर बी एल कंपनीचे क्रेडिट कार्ड व इंडस लँड बँकेचे क्रेडिट कार्डवरुन १ लाख ३७ हजार २३८ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करत आहेत.