सावधान, डेंग्यूचा डंख वाढतोय, विषाणूजन्य आजारांची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 01:00 AM2018-08-06T01:00:10+5:302018-08-06T01:00:22+5:30
पावसाळा सुरू झाला की हैराण करणारा डेंग्यू या डासापासून पसरणारा विषाणूजन्य आजार डोके वर काढू लागला आहे.
पुणे : पावसाळा सुरू झाला की हैराण करणारा डेंग्यू या डासापासून पसरणारा विषाणूजन्य आजार डोके वर काढू लागला आहे. शहरात जुलै महिन्यात डेंग्यूचे ४४५ संशयित रुग्ण आढळून आले असून, ८० जणांना लागण झाली आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांतच संशयित रुग्णांची संख्या ८०च्या पुढे गेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट असल्याने यंदा डेंग्यू ‘ताप’दायक ठरण्याची चिन्हे आहेत.
शहर व उपनगरांमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून येतात. ‘एडिस एजिप्टाय’ हा डास चावल्याने हा आजार होतो. प्रामुख्याने साठलेल्या स्वच्छ पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. हा डास चावल्याने कोणत्याही व्यक्तीला डेंग्यूचा ताप येऊ शकतो. लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो. शहरात जून महिन्यापासूनच पावसाला दमदार सुरुवात झाली. पावसाचा जोर जसा वाढत गेला तसा डेंग्यूचा फैलावही वाढत गेल्याची स्थिती आहे. महापालिकेच्या अहवालानुसार, जून महिन्यात डेंग्यूचे १८१ संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी २८ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जुलै महिन्यात संशयित रुग्णांचा आकडा ४४५वर पोहोचला असून, ८० जणांना लागण झाली आहे. मागील वर्षीची स्थिती पाहिल्यास जून महिन्यात ५८ तर जुलैमध्ये २२८ संशयित रुग्ण आणि अनुक्रमे ६ व ५८ जणांना लागण झाल्याचे आढळून आले होते.
दोन्ही वर्षीची तुलना केल्यास यंदा डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत ८१ संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ७ जणांना हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डेंग्यूचा फैलाव दिवसेेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी डेंग्यू व इतर विषाणूजन्य आजाराला आळा घालण्यासाठी औषध फवारणीसह विविध उपाययोजना केल्या जातात. पाणी साठून राहिलेली ठिकाणे शोधून किंवा तक्रारींनुसार संबंधित आस्थापनांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. यंदाही ही कारवाई सुरू आहे. पण त्यानंतरही डेंग्यूचा फैलाव वाढत असल्याने हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.
>काय काळजी घ्यावी ?
घरात पाणी साठवलेली भांडी झाकून ठेवावीत
आठवड्यातून एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत
घरातील जागा जास्तीत जास्त कोरडी ठेवावी
घरात, भोवताली वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेवू नये
थोडा ताप आला तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
अंगभर कपडे घालावेत
उकळलेले पाणी प्यावे, ताजे अन्न खावे
फळांचा रस यांसह द्रव पदार्थ भरपूर प्रमाणात घ्यावेत
>चिकुनगुनियाही वाढतोय
डेंग्यूप्रमाणेच यावर्षी चिकूनगुनियाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. रुग्णांचा आकडा कमी असला तरी वाढीचा वेग अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसते. जून महिन्यात शहरात चिकुनगुनियाचे केवळ ६ रुग्ण आढळले होते. जुलै महिन्यात हा आकडा ५४ वर जाऊन पोहोचला. मागील वर्षी जून महिन्यात ७, तर जुलै महिन्यात या आजाराचे २८ रुग्ण आढळून आले होते.
>डेंग्यूचा फैलाव
साठलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदास
घरातील कुंड्या, फ्रिजखालील ट्रे, फुलदाणी, एअर कंडिशनर, उघड्यावरील टायर, करवंट्या, गच्चीवर पाणी साठण्याच्या जागा, झाकण उघडे राहिलेल्या पाण्याच्या टाक्या यामध्ये डासांची वाढ
डेंग्यूचे डास प्रामुख्याने दिवसा चावतात
>वर्ष महिना संशयित रुग्ण लागण
२०१७ मे २८ ३
जून ५८ ६
जुलै २२८ ५८
आॅगस्ट ७८६ २३४
२०१८ मे ५१ ३
जून १८१ २८
जुलै ४४५ ८०
दि. ३ आॅगस्टपर्यंत ८१ ७
‘एडिस एजिप्टाय’ हा डास चावल्याने हा आजार होतो.
साठलेल्या स्वच्छ
पाण्यात या
डासांची
उत्पत्ती
होते.