सावधान ! अनोळखींना आधारकार्डची माहिती देताय....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:52 PM2018-05-26T15:52:29+5:302018-05-26T15:52:29+5:30
इंजिनियर मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिने दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत त्याद्वारे बँकेत गैरव्यवहार केल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे : नोकरीसाठी नातेवाईकांचा मोबाईल लिंक असलेले आधारकार्ड पाठविल्याने तरुणी व तिचा काका चांगलेच अडचणीत आले असून त्यांना आता न्यायालयाच्या हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे़. अनोळखी आधार कार्डची माहिती दिल्याने त्यांनी बँकेत बनावट खाते उघडून त्याद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी हर्षद यादव, अनुज कुमार आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याबाबत शिवानी कुलकर्णी (वय २२, रा़ शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी या इंजिनिअर असून त्यांनी एका वेबसाईटवर नोकरीसाठी गेल्या वर्षी जून २०१७ अर्ज केला होता़. काही दिवसांनी त्यांना एक फोन आला व त्याने एच सी एल कंपनीत नोकरीचे आमिष दाखविले़. त्यासाठी त्यांच्याकडून ५ हजार रुपये आॅनलाईन घेतले़. त्यांचा मोबाईल आधारकार्डशी लिंक नव्हता़. त्यामुळे तुमच्या नातेवाईकांपैकी ज्यांचा मोबाईलला आधारकार्ड लिंक असेल, त्यांचा नंबर व आधार नंबर देण्यास सांगितले़. त्याप्रमाणे त्यांनी आपले काका सतीश मारुलकर (रा़ विजयाश्री टॉवर्स, दत्तवाडी) यांना पॅनकार्ड व आधारकार्ड पाठविले़ या कागदपत्रांचा गैरवापर करुन त्यांनी कोटक महिंद्रा बँकेत काकांच्या संमतीशिवाय बँक खाते उघडले़. त्या खात्यावर गैरव्यवहार केले़.
शिवानी कुलकर्णी यांना नोकरी काही मिळाली नाही़, त्यांची ५ हजार रुपयांची फसवणूक झाली़. पण, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले़. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांना न्यायालयाचे समन्स आले़. त्यात त्यांच्या खात्यात लोकांची फसवणूक करुन मिळविलेले पैसे जमा झाले होते़. त्याबाबत त्यांनी माहिती घेतली, तेव्हा कुलकर्णी यांना बँकेत बनावट खाते उघडलेले आढळले. त्यावर त्यांच्या काकाच्या पाठविलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन इंटरनेटद्वारे बँकेत त्यांच्या नावाने बँकेत खाते उघडलेले आढळले. अन्य फसवणुकीच्या गुन्ह्यातील पैसा या खात्यावर मागविण्यात आला़. सुमारे एक महिन्याच्या कालावधीत त्यात ५ ते ६ गैरव्यवहार झाले़. त्यानंतर हे खाते बंद केले गेले़ याचा काहीही पत्ता सतीश मारुलकर यांना नव्हता़. न्यायालयाचे समन्स आल्यानंतर त्यांना हा सर्व प्रकार समजला़. तेव्हा शिवानी कुलकर्णी यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ते फसवणुकीच्या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत़.