टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:02+5:302021-06-17T04:08:02+5:30

पुणे : लॉकडाऊनच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मोठ्या व्यक्तींचे, तर ‘ऑनलाईन स्कूल’मुळे लहानग्यांचे घरातील वास्तव्य वाढले आहे. परिणामी, स्क्रीनटाइमही ...

Be careful if you are sitting in front of the TV eating; Fear of growing stomach upset! | टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती!

टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती!

Next

पुणे : लॉकडाऊनच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मोठ्या व्यक्तींचे, तर ‘ऑनलाईन स्कूल’मुळे लहानग्यांचे घरातील वास्तव्य वाढले आहे. परिणामी, स्क्रीनटाइमही वाढला आहे. टीव्हीसमोर बसून जेवणे, मोबाईलवर गेम खेळता खेळता नाश्ता असे चित्र घरोघरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे, पोटदुखी, मलावरोध असे पोटाशी सबंधित विकारही वाढले आहेत.

सकाळच्या वेळेत मुलांची ऑनलाईन शाळा असते. चार-पाच तास अभ्यास करून मुले कंटाळलेली असतात. अभ्यासामुळे आलेला शीण घालवण्यासाठी विरंगुळा म्हणून मुले टीव्ही पाहत किंवा मोबाईलवर गेम खेळत दुपारचे जेवण करतात. म्हणजे पुन्हा स्क्रीनसमोरच वेळ जातो. आपण किती आणि काय खात आहोत, याकडे लक्ष नसते. पालकही दिवसभर कॉम्प्युटरवर काम केल्यावर रात्रीचे जेवण टीव्ही पाहत करतात. अर्धे लक्ष टीव्हीत असल्याने अन्नाचे घास पूर्ण चावले जात नाहीत. बरेचदा अन्न नुसते गिळले जाते. त्यामुळे अपचनाचा त्रास उद्भवतो. अन्न नीट न चावता खाल्ल्याने पोट फुगते, आतड्याशी संबंधित विकार उद्भवतात. अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रासही होतो. पित्ताशयात खडे होऊ शकतात. पोटदुखीचा त्रास होत असल्यास दुखणे अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.

---------

अन्न पचण्याची प्रक्रिया तोंडापासूनच सुरू होते. अन्न नीट न चावता गिळल्यास अपचनाचा त्रास सुरू होतो, पित्त वाढते. वारंवार पोटदुखी उद्भवते. त्यामुळे जेवताना स्क्रीनसमोर न बसण्याची शिस्त कुटुंबाने पाळायला हवी. एकमेकांशी गप्पा मारत जेवल्याने वेळेचा सदुपयोग होतो.

- डॉ. नचिकेत दुबळे, पोटविकारतज्ज्ञ

----------

अन्न चावून खाल्ल्याने दात मजबूत होतात, भूक वाढते, अन्न पचते आणि त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात. शरीराशी संबंधित बहुतांश आजार हे पोटाशी आणि पचनाशी संबंधित असतात. बरेचदा टीव्ही पाहत जेवल्याने अतिरिक्त अन्न पोटात जाते आणि वजन वाढते. अपचन झाले की अॅसिडीटीचा त्रास होतो. अॅसिडीटी वारंवार होत राहिली तर आतड्याचा किंवा पोटाचा अल्सरही होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने जेवणे टाळावे.

- डॉ. निमिष देशपांडे, कन्सल्टिंग फिजिशियन

------

पालकांचे काय म्हणणे?

मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. त्यांचा जंक फूडकडील कल वाढला आहे. पोळी-भाजी खायची म्हटली की मुले नाक मुरडतात. मग मुलांनी सर्व भाज्या खाव्यात म्हणून पालक मुलांना टीव्ही लावून देतात. पण अशा पद्धतीने जेवल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही आणि शरीराचे व्यवस्थित पोषणही होत नाही. मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे पालकांनी लहानपणापासून मुलांना स्क्रीनसमोर न बसता पूर्ण लक्ष देऊन जेवणाची सवय लावावी, पौष्टिक आहाराचे महत्त्व समजून सांगावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

------

पोटविकार टाळायचे असतील तर....

* अन्न चावून खावे आणि हळूहळू खावे.

* वेळच्या वेळी आणि प्रमाणात आहार घ्यावा.

* आहारात पालेभाज्या, सॅलड, कच्च्या भाज्या, कडधान्ये, ताक अशा पदार्थांचा समावेश असावा.

* जेवताना पाणी पिऊ नये.

* उभ्याने जेवू नये, बसून जेवावे.

Web Title: Be careful if you are sitting in front of the TV eating; Fear of growing stomach upset!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.