सावधान ! कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 08:49 PM2018-04-20T20:49:09+5:302018-04-20T20:49:09+5:30
कबुतरांना दाणे टाकणं काहींसाठी भूतदयेचा भाग असलं तरी त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
पुणे :कबुतरांना दाणे टाकणं काहींसाठी भूतदयेचा भाग असलं तरी त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही लोकांची ही भूतदया अनेकांना रुग्ण बनवत असल्याचे उदाहरण पुण्यातील काही भागात दिसून आले आहे.
शहरातील नदीपात्र किंवा तत्सम भागात अनेक जण कबुतरांना येऊन धान्य टाकतात. एवढेच नव्हे तर कोथरूड भागातही काही दुकानदार दुपारी कबुतरांना दाणे टाकतात. त्याबाबत विचारले असता काहींनी भूतदया तर एकाने त्यामुळे पुण्य लाभत असल्यामुळे वर्षानुवर्षे धान्य टाकत असल्याचे कारण दिले आहे. या विषयावर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही चर्चा करण्यात आलेली आहे. या कबुतरांमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याचे आरोग्य प्रभारींनीदेखील मान्य केले होते. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी नियमावली तयार करण्याचे आदेश मुख्यसभेला दिले होते. या कबुतरांना एखादी विशिष्ट जागा देऊन तिथे धान्य देणे शक्य आहे का याचा अहवालही त्यांनी प्रशासनाकडे मागितला होता. दुसरीकडे महापालिका प्रशासन गप्प असताना नागरिकांना दमा, श्वसनाचे आजार, फुफ्फुसात जंतुसंसर्ग, खोकला, न्यूमोनिया असे आजार जडत आहेत.
नदी पात्राच्याजवळ राहणारे विजय परांजपे यांनी आपल्याला काही दिवसांपूर्वी प्रचंड खोकला झाल्याचे सांगितले. मात्र हा खोकला खूप औषध घेऊनही बरा होत नसल्याने डॉक्टरांनी तपासणी करण्याचे सुचविले. त्यात कबुतरांमुळे फुफ्फुसाला जंतुसंसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.अखेर हवापालट करण्यासाठी बाहेरगावी गेल्यावर खोकला कमी झाल्याचे ते म्हणाले.
याबाबत उरोग व क्षयरोगतज्ज्ञ डॉ संजय गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना पक्षांच्या विष्ठेतून श्वसनाचे आजार होत असल्याचे सांगितले. पक्षांची विष्ठा सुकल्यावर त्याचे कण श्वासावाटे शरीरात जाऊन आजार बळावतात असेही त्यांनी मान्य केले.केवळ कबुतर नव्हे तर पोपट, लव्हबर्ड या पक्षांमुळेही आजार होत असतात. तर प्राण्यांच्या अंगावरील केसांमुळे त्वचेचे विकार होतात असेही ते म्हणाले. लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांना असे विकार होऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.