लॉटरी लागल्याचा मेसेज आल्यास राहा सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:18 AM2021-08-17T04:18:18+5:302021-08-17T04:18:18+5:30

पुणे : लहानपणी शाळेत असताना मला लॉटरी लागली तर.. असा निबंधाचा विषय अनेकदा दिला जात असे. लॉटरी लागली तर ...

Be careful if you get a lottery message | लॉटरी लागल्याचा मेसेज आल्यास राहा सावधान

लॉटरी लागल्याचा मेसेज आल्यास राहा सावधान

Next

पुणे : लहानपणी शाळेत असताना मला लॉटरी लागली तर.. असा निबंधाचा विषय अनेकदा दिला जात असे. लॉटरी लागली तर त्यातून मिळणाऱ्र्या पैशातून तुम्ही आपल्या मनातील इच्छा कशा पूर्ण करणार, हे त्यातून मांडण्याची संधी दिली जात होती. पण, आता डिजिटलच्या युगात खरोखरच ही इच्छा पूर्ण करणारे मेसेज येतात. मात्र, ही १०० टक्के फसवणूक असते. या माध्यमातून फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे असा मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष करा. नाही तर या जाळ्यात अडकून तुमची आर्थिक फसवणूक नक्की होईल.

लॉटरी लागली, परदेशातून गिफ्ट पाठविले आहे, अशा प्रकारच्या आमिषांना नायजेरियन फ्रॉड म्हणून सायबर क्राईममध्ये ओळखले जाते. त्यात एखाद्या परदेशातील कंपनीच्या नावाने ई-मेल पाठविले जातात. ते ई-मेल उघडल्यानंतर तुम्हाला काही तरी कारण दाखवून लॉटरी लागल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात तुम्ही लॉटरीचे तिकीट काढले नसतानाही ही लॉटरी कशी लागली, हा विचार तुमच्या मनात येऊ नये, इतक्या आकर्षक पद्धतीने सायबर चोरटे सावज हेरतात. त्यासाठी परदेशातील काही लॉटऱ्र्यांची उदाहरण तुम्हाला देऊन विश्वास संपादन करतात.

२५ लाखांच्या लॉटरीपायी गमावले २३ लाख

काही दिवसांपूर्वी लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यावरून सायबर चोरट्यांनी शक्कल लढवून कौन बनेगा करोडपतीचे २५ लाखांची लॉटरी तुम्हाला लागली असल्याचे हिंगणे खुर्द येथील एका ३९ वर्षांच्या महिलेला कळविले अमिताभ बच्चन यांचे नाव ऐकूनच ती इतकी भारावून गेली की, ही लाॅटरीची रक्कम मिळविण्यासाठी सायबर चोरटे सांगतील, त्यानुसार वेळोवेळी तब्बल २३ लाख रुपये वेगवेगळ्या बँकेत भरले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.

त्याचप्रमाणे वाकड येथील एका व्यावसायिकाला मित्राला १०० कोटी रुपयांची लाॅटरी लागली आहे. त्याचे पैसे तुमच्या खात्यात वळते करायचे आहे, असे सांगितले गेले. हे पैसे मिळण्यासाठी जीएसटी, ट्रान्सफर चार्जेस, ड्युमरेज चार्जेस, कन्वर्जन चार्जेस, मनी लाँडरिंग चार्जेस, प्रोसेसिंग फी, स्टॅम्प चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस आणि हॉटेल बिल अशा विविध चार्जेसच्या नावाखाली पैशांची मागणी केली. या व्यवसायिकानेही त्यावर विश्वास ठेवून तब्बल १ कोटी ५२ लाख रुपये भरले होते.

लॉटरी लागली असल्याचे सांगून १६ लाख ३२हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्र्या एका नायजेरियनला पुण्यातील न्यायालयाने ३ वर्ष शिक्षा व ४० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. मात्र, यामध्ये फसवणूक झालेल्या फिर्यादीला मात्र एकही पैसा परत मिळू शकला नव्हता. त्यामुळे असा कोणताही लॉटरी लागल्याचा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका, असे पोलीस वारंवार आवाहन करीत असतात.

Web Title: Be careful if you get a lottery message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.