MPSC वर दबाव आणाल तर खबरदार; नव्या अभ्यासक्रमावरून आयोगाचा विद्यार्थ्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:57 AM2022-07-25T08:57:44+5:302022-07-25T08:58:14+5:30
एमपीएससीकडून आंदोलन करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना इशारा...
पुणे : नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल केल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तर तो एमपीएससीवरील दबाव समजून कारवाई केली जाईल, असा इशारा एमपीएससीकडून आंदोलन करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल केला आहे. यापुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा होणार आहेत. या नवीन परीक्षा पद्धतीला उमेदवारांनी विरोध केला आहे. यावर शनिवारी रात्री एमपीएससीने ट्वीट करून यासंदर्भात हा इशारा देऊ केला आहे.
नवीन परीक्षा पद्धतीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) हटविण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सर्व पेपर वर्णनात्मक स्वरूपात द्यावे लागणार आहेत. सन २०२३ पासून सर्व परीक्षांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. याला विद्यार्थी संघटना विरोध करीत असून, इतके वर्षे एमसीक्यू पद्धतीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
आंदोलन घेतले मागे
एमपीएससीने हा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र, यामध्ये कोणतीही संघटना समोर न येता विद्यार्थी ही मागणी करीत आहेत. तसेच ही मागणी मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला होता. मात्र, इशारा दिल्यावर अखेर विद्यार्थ्यांनी २५ जुलैला करण्यात येणारे आंदोलन मागे घेतले आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून अशा घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 23, 2022
दुसरा पर्याय नाही
पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन केले जाणार नाही, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. अभ्यासक्रम बदल आणि परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या निर्णयावर एमपीएससी ठाम असल्याने आता विद्यार्थ्यांना हा निर्णय मान्य करावा लागणार आहे.