संसर्ग पुन्हा वाढू नये म्हणून काळजी घ्या -बारामतीत घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:26+5:302021-07-11T04:08:26+5:30

बारामती : शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोना संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येकाने ...

Be careful not to let the infection spread again | संसर्ग पुन्हा वाढू नये म्हणून काळजी घ्या -बारामतीत घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

संसर्ग पुन्हा वाढू नये म्हणून काळजी घ्या -बारामतीत घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

Next

बारामती : शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोना संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहून योग्य नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, म्युकरमायकोसिस संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

अजित पवार म्हणाले की, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही, त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले असेल तरी नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे, लिक्विड ऑक्सिजन साठा पुरेशा प्रमाणात करून ठेवणे, लसीकरणाचे नियोजन योग्य प्रकारे करावे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची योग्य देखभाल होणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच टाटा ट्रस्ट मुंबई यांच्याकडून कोरोना रुग्णासाठी १५ कॉन्सेन्ट्रेटर देण्यात आले. त्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या वेळी डॉ. संतोष भोसले, प्रशासकीय व वैद्यकीय अधिकरी उपस्थित होते. या वेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री यांनी दिल्या ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचे व शुभेच्छा बॅनरचे उद्घाटन क्रीडा संकुल, बारामती येथे करून खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके मिळवावीत व देशाचे नाव उंच करावे, यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले. या वेळी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

----------------------------

फोटो ओळी : क्रीडा संकुल येथे सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

१००७२०२१-बारामती-०३

Web Title: Be careful not to let the infection spread again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.