पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्या; पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 09:17 PM2023-06-19T21:17:04+5:302023-06-19T21:17:14+5:30
रस्त्यावरील खड्यांची पाहणी करून तत्काळ दुरूस्ती करून घेतल्यास वाहतूक कोंडी होणार नाही
पुणे : शहरातील विविध कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था होऊन त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, पादचाऱ्यांना नेहमी जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालावे लागत आहे. अनेक भागांत सांडपाण्याची वाहिनी तुंबल्यामुळे अगर फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यांवर साचल्यामुळे रस्ता वाहतुकीस उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील वॉटर लॉगिंगचे ठिकाणांची व ड्रेनेजच्या झाकणांची पाहणी करा. रस्त्यावरील खड्यांची पाहणी करून तत्काळ दुरूस्ती करून घेतल्यास वाहतूक कोंडी होणार नाही, अशा सूचना पुणेपोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे महापालिकेला केल्या आहेत.
शहरात विविध विकासकामे सुरू असून विविध विकासकामांकरीता रस्ते खोदाई करण्यात येते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाकरीता खोदलेले रस्ते तत्काळ दुरूस्त केले जात नाहीत. कंपनीने नियुक्त केलेला ठेकेदार खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवत नाहीत. खडी, माती टाकून बुजवलेल्या रस्त्यावरून गाडी गेल्यास रस्ता लगेच खचून जातो. त्यात पाणी साचल्याने खड्डे तयार होतात. हे खड्डे अपघातास कारणीभूत होतात. फूटपाथ, रस्ते या ठिकाणी विशेषतः शहराचे मध्यवर्ती भागात मोठया प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत परिणामी वाहतुकीस रस्ता कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वाहतूक कोंडीच्या घटना घडत आहेत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा ठिकाणी वाहनचालक रस्त्यातच वाहन उभे करत असतात, फूटपाथवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यासाठी अतिक्रमणे काढण्यात यावी. शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनांकरीता पार्किंग उपलब्ध नसल्याने रोडवर वाहने पार्क होत असतात. त्यासाठी पालिकेने जास्तीत जास्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरील सर्व स्टेक होल्डर्स यांची संयुक्त बैठक झाल्यास एकत्रित चर्चा होऊन पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करणेबाबत तत्काळ अंमलबजावणी करणे सोयीचे होईल, असे पोलिस आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मेट्रोच्या कामाने अडचणी वाढल्या
मेट्रोचे कामकाज चालू असून त्या कामाच्या अनुषंगाने रस्त्यावर खोदण्याचे कामे करण्यात आलेली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याकरिता खोदलेले रस्ते दुरूस्त केले गेलेले नाहीत. त्यामध्ये तात्पुरती खडी, माती टाकून ते बुजविण्यात येतात. या ठिकाणावरून वाहने जाऊन रस्ता खचला जातो. त्यामुळे मोठा खड्डा होऊन पावसाचे पाणी साठवून अपघात होण्याची शक्यता असते. मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यावर तसाच पडून वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.