पुणेकरांनो,कचरा कराल तर खबरदार! ५० रुपये ते १० हजारांपर्यंतचा होऊ शकतो दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 08:23 PM2020-08-12T20:23:29+5:302020-08-12T20:53:48+5:30
महापालिका आयुक्तांनी काढले आदेश पुणेकरांनो,कचरा कराल तर खबरदार! ५० रुपये १० हजारांपर्यंतचा होऊ शकतो दंड
पुणे : कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास यापुढे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून यासोबतच कचरा जाळणाऱ्यांकडूनही दंड वसुली केली जाणार आहे. पाळीव प्राण्यांनी घाण केल्यास त्याला मालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी काढले.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार, नागरिकांना ओला, सुका आणि जैविक कचऱ्यांचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. वर्गीकरण न करता कचरा दिल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे पालन केल्यास पहिल्यांदा ६० रुपये, दुसऱ्यांदा १२० रुपये तर पुढील प्रत्येक वेळी १८० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर, रस्त्यावर कचरा करणे, सार्वजनिक ठिकाणांवर थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, उघड्यावर शौच करणे, पाळीव प्राण्यांना लघू शंका -शौचास नेणे, नाले-नदी-तलाव-घाटावर कचरा टाकणे आणि कचरा जाळणे असे प्रकार केल्यास दंड वसुली केली जाणार आहे.
या कचऱ्यासोबतच बांधकामाच्या राडारोड्याचा प्रश्नही गंभीर आहे. त्यामुळे हा कचरा वाहून नेण्याची आणि प्रक्रिया करण्याची यंत्रणा पालिकेने उभारलेली आहे. नागरिकांनी पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून राडारोड्यासंदर्भात माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. राडारोडा नदी वा नाल्यांचे पात्र, पदपथ किंवा रस्त्याच्या कडेला टाकल्यास त्यांच्यावर पाच हजार आणि दुस-या वेळी साडेसात हजार तर पुढील प्रत्येक खेपेस दहा हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे.
========
पालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याकरिता स्वच्छ संस्थेसोबत करार केलेला आहे. स्वच्छच्या कर्मचाऱ्यांना घरटी पैसे द्यावे लागतात. त्याला झोपडपट्टीतील नागरिकही अपवाद नाहीत. झोपडपट्टीतील प्रत्येक घरामागे दरमहा ५० रुपये शुल्क आकारण्याचे पालिका आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. सोसायट्यांसाठी ७० रपये तर व्यावसायिक आस्थापनांसाठी १४० रुपये दरमहा निश्चित करण्यात आले आहेत.
========
प्रकार दंड
रस्त्यावर कचरा करणे १८०
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५०
उघड्यावर लघवी करणे २००
उघड्यावर शौच करणे ५००
पाळीव प्राण्यांनी घाण केल्यास १८०
नाले-नदी-तलाव-घाटावर कचरा टाकणे २००
कचरा जाळणा-यांकडून ५००