कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते इजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:52+5:302021-08-27T04:13:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण चष्म्याशिवाय आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र, लेन्स वापरताना काळजी ...

Be careful when using contact lenses, otherwise injury may occur | कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते इजा

कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते इजा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण चष्म्याशिवाय आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र, लेन्स वापरताना काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग किंवा बुबुळाला इजा होऊ शकते. लेन्सच्या चुकीच्या आणि जास्त वापरामुळे बुबुळ पातळ होणे, त्यावर छोट्या जखमा होणे, डोळे लाल होणे, पापण्यांना सूज होणे, बुबुळांवर पडदा तयार होणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे एका वेळी सहा-आठ तासांपेक्षा जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे अपायकारक ठरते.

नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. हेमंत तोडकर म्हणाले, ‘अनेक जण चष्म्याला पर्याय म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. चष्म्याचा नंबर नसलेले लोक खास प्रसंगांसाठी कॉस्मेटिक कलर्ड लेन्सचा उपयोग करतात. कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्स जास्तीत जास्त चार-पाच तासच वापरणे योग्य ठरते. कारण, त्यातून कलर पिगमेंट डोळ्यांत मिसळत असतात. हवेतून बुबुळाला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला असतो. ज्यांना चष्म्याचा नंबर आहे, मात्र त्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरायच्या आहेत, त्यांनी दिवसभरात ८ तासांहून अधिक काळ कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करु नये. लेन्स जास्त काळ वापरल्यास बुबुळांना संसर्ग होणे, ऑक्सिजनचा कमी पुरवठा होणे, पापण्यांना सूज येणे असे त्रास होतात.’

---------------------------

कॉन्टॅक्ट लेन्स ज्या सोल्युशनमध्ये ठेवल्या जातात, ते ठरावीक कालावधीनंतर बदलणे आवश्यक आहे. सोल्युशनची बाटली उघडी राहिल्यास हवेतील जंतू त्यात शिरकाव करतात आणि तिथून डोळ्यांपर्यंत पोहोचतात. लेन्स घालण्यापूर्वी आणि काढल्यानंतर स्वच्छ करुन डबीमध्ये ठेवाव्यात. बरेच लोक बाऊल, वाटीमध्ये साधे पाणी घालून लेन्स ठेवतात. यामुळे लेन्सची स्वच्छता व्यवस्थित राखली जात नाही आणि दृष्टीवरही परिणाम होतो. डोळ्यांमधून पाणी येत असेल, डोळे लाल झाले असतील तर ४-५ दिवस लेन्स वापरू नयेत.

- डॉ. हेमंत तोडकर, नेत्ररोगतज्ज्ञ

-----------------------------

काय काळजी घ्यावी?

* एक्सटेंडेड वेअरच्या कॉन्टॅक्ट लेन्स एक वर्षापर्यंत वापरता येतात.

* डिस्पोजेबल कॉन्टॅक्ट लेस दर दिवशी किंवा दर महिन्याला बदलता येऊ शकतात.

* सध्या ऑनलाईन शाळा, वर्क फ्रॉम होममुळे स्क्रीन टाइम वाढला आहे. मात्र, वर्क फ्रॉम होममुळे कॉम्प्युटरसमोर बसण्याचा कालावधी दहा-बारा तास इतका असू शकतो. अशा वेळी सातत्याने लेन्सचा वापर करणे टाळावे.

* डोळे लाल असताना, पाणी येत असताना चार-पाच दिवस लेन्स वापरू नये.

* ज्यांच्या चष्म्याचा नंबर -३ किंवा अडीचहून जास्त असेल त्या व्यक्ती पूर्णपणे चष्म्यावर अवलंबून असतात. अशांना कायम चष्मा वापरण्याची गरज भासते. बरेच लोक केवळ लेन्स वापरतात आणि चष्मा करूनच घेत नाहीत. लेन्सचा अतिवापर घातक ठरतो, हे विसरुन चालणार नाही.

Web Title: Be careful when using contact lenses, otherwise injury may occur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.