काळजी घ्या, आपल्याकडे तिसऱ्या लाटेची शक्यता - डाॅ. अविनाश भोंडवे - ‘कोरोना....आज, उद्या आणि पुढे’ वर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:47+5:302021-09-21T04:13:47+5:30
‘सृष्टी’ संस्थेतर्फे आय. एम. ए. महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे ‘कोरोना…आज, उद्या आणि पुढे..? या विषयावर व्याख्यान ...
‘सृष्टी’ संस्थेतर्फे आय. एम. ए. महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे ‘कोरोना…आज, उद्या आणि पुढे..? या विषयावर व्याख्यान आयोजिले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार हे होते.
भोंडवे म्हणाले, कोरोना विषाणूचे म्युटेशन होऊन हा विषाणू दिवसेंदिवस मानव जातीसमोर नवनवीन आव्हाने उभी करीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून प्रत्येक देशातील सरकार एकमेकांशी माहितीचे आदान-प्रदान करून समन्वयाने या महामारीचा सामना करत आहे. प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रबोधन या दोन्ही पातळींवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर आणि राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त केलेले सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांचा डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते विशेष सत्कार झाला.
मुजुमदार म्हणाले, कोरोनाने झाकोळलेल्या आणि काळवंडलेल्या वातावरणात कुठेतरी दोन क्षण हलके-फुलके हवेहवेसे वाटतात; परंतु वैद्यकीय औषध उपचारांनी बरा होणारा कोरोना नागरिकांच्या मनावर देखील झाला आहे. हा मनातील कोरोना नष्ट होणे गरजेचे आहे.
विद्याधर अनास्कर म्हणाले, आज झालेला सत्कार हा मायेच्या लोकांनी केलेला सत्कार आहे.
सुरेंद्रनाथ देशमुख म्हणाले, नोकरीनिमित्त अनेकदा समाजाच्या नकारात्मक बाबींनाच जास्त सामोरे जावे लागते. अशावेळी मन खिन्न होते. समाजात ज्या पायांवर मस्तक ठेवून त्यांचा आशीर्वाद घ्यावेत असे पायच कमी उरले आहेत.
सचिन नाईक यांनी प्रास्ताविक केले, तर प्रशांत कोठाडिया यांनी सूत्रसंचालन केले.
----------------------
छायाचित्र ओळीः-
‘सृष्टी’ संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात विद्याधर अनास्कर आणि सुरेंद्रनाथ देशमुख यांचा विशेष सत्कार झाला. यावेळी सत्कार स्वीकारताना (डावीकडून) प्रशांत कोठाडिया, डॉ. अविनाश भोंडवे, सुरेंद्रनाथ देशमुख, डॉ. शां. ब. मुजुमदार, विद्याधर अनास्कर आणि सृष्टी प्रतिष्ठानचे अध्य़क्ष सचिन नाईक.