सावधान, तुमची मुले सायबर चोरट्यांबरोबर तर गेम खेळत नाहीत ना!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:58 PM2022-08-04T15:58:14+5:302022-08-04T16:00:02+5:30

लहान मुले आई-वडिलांचा मोबाइल घेऊन व्हिडीओ गेम खेळत असताता....

Be careful your kids are not playing games with cyber thieves pune crime news | सावधान, तुमची मुले सायबर चोरट्यांबरोबर तर गेम खेळत नाहीत ना!

सावधान, तुमची मुले सायबर चोरट्यांबरोबर तर गेम खेळत नाहीत ना!

googlenewsNext

पुणे : अनेक लहान मुले आई-वडिलांचा मोबाइल घेऊन व्हिडीओ गेम खेळत असतात. पालकही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. खूप वेळ गेम खेळत असल्यास त्यांना रागावून मोबाइल हातातून काढून घेतात; पण तो नेमका कोणाबरोबर व्हिडीओ गेम खेळत आहे, याकडेही लक्ष देण्याची वेळ आली आहे. कारण, सायबर चोरट्यांनी मुलांबरोबर व्हिडीओ गेम खेळत त्यांना फ्री फायर गेमची डायमंड मेंबरशिप देण्याचा बहाणा करून आईचा मोबाइल हॅक करून तब्बल सव्वालाख रुपयांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी शिवणे येथील एका ३४ वर्षांच्या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि.१ डिसेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ यादरम्यान घडला. त्याचा गुन्हा आता दाखल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेला १२ व १० वर्षांची दोन मुले आहेत. पती व्यावसायिक आहेत. त्यांची मुले फिर्यादीच्या मोबाइलवर फ्री फायर गेम खेळत असत. त्या ऑनलाइन गेममध्ये काही अनोळखी मुले सहभागी व्हायची. त्यांच्यासोबत ते मोबाइलवर गेम खेळत असत. त्यातील अंकू नावाच्या मुलाने फिर्यादीच्या मुलांना तुम्हाला फ्री फायर गेमची डायमंड मेंबरशिप पाहिजे का, अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी मेंबरशिप नको, असे सांगितले. त्यानंतरही अंकू हा सातत्याने त्यांना फोन करीत होता. मुलांशी गोड बोलून त्याने फिर्यादीच्या पतीचा ई-मेल पासवर्ड मागून घेऊन त्यांचे जी मेल अकाउंट हॅक केले.

तीन दिवसांनी अंकू याने त्यांच्या मुलाला १,६०० रुपये पाठविण्यास सांगितले. तेव्हा त्याला गुगल पे करून मुलांनी पैसे पाठविले. त्यानंतर दोन मोबाइलधारक वारंवार फोन करून त्यांच्या मुलांकडून ओटीपी मागून फिर्यादीच्या खात्यातून पैसे काढून घेत असत. त्यांचा मोबाइल हॅक केल्याने खात्यातून पैसे काढल्याचे मेसेज त्यांना मिळत नव्हते. एक महिन्यानंतर त्यांच्या पतीला कामाकरिता पैसे पाठवायचे असल्याने त्यांनी फिर्यादी यांचा मोबाइल चेक केला असता त्यांच्या खात्यातून १ लाख २७ लाख ७४४ रुपये काढले गेल्याचे आढळून आले. त्यांनी बँकेत जाऊन स्टेटमेंट मागविले असता उत्तर प्रदेशातील सायबर चोरट्यांनी मुलांना हाताशी धरून ही सायबर चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलीस निरीक्षक दत्ता बागवे तपास करीत आहेत.

Web Title: Be careful your kids are not playing games with cyber thieves pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.