मालक असावा तर असा! आजारी कर्मचाऱ्याला भेटायला आले रतन टाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:58 AM2021-01-06T01:58:59+5:302021-01-06T20:32:38+5:30
Ratan Tata News: पुंडलिका भेटी जणू परब्रह्म आले ! आपल्या एका माजी आजारी कर्मचाऱ्याला भेटायला ते थेट पुण्यातील त्याच्या घरी आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सामाजिक बांधिलकी जपणारे... गोरगरीबांसाठी धावून जाणारे... गरजूंना सढळ हाताने मदत करणारे... कोविड रुग्णालय उभारणारे... लॉक डाऊनच्या काळात कामगारांच्या पाठीशी उभे राहणारे... अत्यंत साधे, विनम्र असे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा. आपल्या या लौकिकात त्यांनी रविवारी भरच घातली.
आपल्या एका माजी आजारी कर्मचाऱ्याला भेटायला ते थेट पुण्यातील त्याच्या घरी आले. तेही कुठला बडेजाव, लवाजमा सोबत न घेता. कोथरूडमधील वूडलँड सोसायटीत राहणाऱ्या इनामदार यांना भेटायला खुद्द रतन टाटा आले, याचा पत्ताही रहिवाशांना लागला नाही. मुंबईहून दुपारी तीन वाजता पुण्यात आलेले रतन टाटा थेट इनामदारांच्या घरी गेले. दोन वर्षांपूर्वी टाटा समूहासाठी काम करणाऱ्या मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आजारी असणाऱ्या आपल्या सहकाऱ्याची टाटांनी आवर्जून भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी या आजारी सहकाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचे आश्वासनही दिले.
या दोघांच्या भेटीचा फोटो सोसायटीत राहणाऱ्या एकाने ट्विटरवर टाकला. त्यामुळे सोसायटीत गर्दी होऊ लागली. पण तोपर्यंत टाटा शांतपणे निघून गेले.
विनम्रता आणि साधेपणा अनुभवला
मी रविवारी दुपारी सोसायटीत परतत होतो. तितक्यात रतन टाटा गाडीतून उतरले. तेवढ्याच वेगाने ते लिफ्टमध्ये शिरले. त्यांची विनम्रता आणि साधेपणा वाखाणण्याजोगा होता. परत जाण्यासाठी ते जेव्हा पार्किंगमध्ये आले. तेव्हा मी आणि मुलगी आदिश्री त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला ध्येयावर लक्ष केंद्रित करा, असा कानमंत्र त्यांनी दिला.
- अभिजित मकाशीर,
अध्यक्ष, वूडलँड सोसायटी