'बी पॉझिटिव्ह'! कोरोनाला मात दिल्यानंतर 'या' पुणेकराने केले तब्बल ९ वेळा प्लाझ्मा दान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 04:34 PM2021-02-20T16:34:21+5:302021-02-20T16:34:39+5:30
पुण्याचा रहिवासी असणारे ५० वर्षांचे अजय मुनोत आणि त्यांची पत्नी २८ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
पुणे : कोरोना झाला तर काय आणि यामुळेच पॉझिटिव्ह शब्दाभोवतीची बसलेली बसलेली 'निगेटिव्हिटी' याला अपवाद ठरला आहे एक पुणेकर. कोरोनामधून बरा झाल्यानंतरच या माणसाने तब्बल ९ वेळा प्लाझादान करत त्याने कोरोना रुग्णांना जीवदान दिले आहे.
पुण्याचा रहिवासी असणारे ५० वर्षांचे अजय मुनोत आणि त्यांची पत्नी २८ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्रास होत असल्याने मुनोत यांना बालेवाडी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. श्वसनाचा काही काळ झालेला त्रास वगळता इतर काही त्रास त्यांना झाला नाही. मात्र कोरोनाची एकूण परिस्थिती पाहता त्यांनी त्याच वेळी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत'शी बोलताना मुनोत म्हणाले “ मी बरा झाल्यानंतर ॲण्टी बॅाडीज आहेत का याची चाचणी केली. त्यानंतर पहिल्यांदा प्लाझ्मा दान केले. यानंतर मला लक्षात आले की, १४ दिवसांच्या खंडानंतर पुन्हा प्लाझ्मा दान करता येते. मग मी सातत्याने दान करायला सुरुवात केली. १७ तारखेला माझा पन्नासावा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मला १७ तारखेलाच दान करायचे होते. मात्र १४ दिवस न झाल्याने त्या दिवशी प्लाझ्मा देता आला नाही. पण आज मात्र मी दान केले.”
मुनोतांचे हे ९ वे प्लाझ्मा डोनेशन होते. असे दान करता येते का याबाबत विचारले असता डॅा. संजय पाटील म्हणाले “ प्लाझ्मा दानासाठी ॲण्टी बॅाडीजची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे जर योग्य असेल तर कितीही वेळा प्लाझ्मा दान करता येते. जीव वाचवण्यासाठी प्लाझ्माचा उपयोग होतो. त्यासाठी लोकांनी प्लाझ्मा दान करणे महत्वाचे आहे”