हजर व्हा; अन्यथा कारवाईला सामोरे जा
By admin | Published: June 10, 2015 05:28 AM2015-06-10T05:28:47+5:302015-06-10T05:28:47+5:30
शिक्षण मंडळाच्या शाळांमधील बदली झालेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बुधवारपासून बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा सज्जड दम महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळांमधील बदली झालेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बुधवारपासून बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा सज्जड दम महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच जे कामावर हजर होणार नाहीत त्यांच्यावर कडक करवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या बदलीचा तिढा मंगळवारीही न सुटल्याने या कर्मचाऱ्यांनी महापालिका भवनाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. तर या बदल्या रद्द करण्यास पालिका प्रशासनानेही नकार दिला असल्याने या वादावर कोणताही तोडगा निघालेला नाही.
शिक्षण मंडळाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे आल्यानंतर मंडळाने पहिल्यांदाच शिक्षक, रखवालदार आणि शिपाई यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी हे बदल्यांचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले. मात्र शिक्षक संघटनांनी या सरकट बदल्यांना विरोध करीत त्या रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. मंगळवारी बदल्या रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी संघटनांच्या वतीने पालिका भवनासमोर निदर्शने करण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज स्थायी समितीमध्येही काही सदस्यांनी महापालिका भवनाबाहेर जमलेल्या गर्दीबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, कोणत्याही बदल्या रद्द करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. ज्या शिक्षक, रखवालदार आणि शिपाई यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, ते बुधवारपासून बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)