समस्यावर उपाय शोधत आत्मनिर्भर व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:43+5:302021-03-08T04:11:43+5:30
पुणे : सद्यस्थितीत पर्यावरणाबाबतच्या समस्यांवर उपाय शोधण्याची गरज असून इनोफेस्टच्या माध्यमातून आपण केवळ स्पर्धा घेत नाही तर; आपल्याच प्रश्नांवर ...
पुणे : सद्यस्थितीत पर्यावरणाबाबतच्या समस्यांवर उपाय शोधण्याची गरज असून इनोफेस्टच्या माध्यमातून आपण केवळ स्पर्धा घेत नाही तर; आपल्याच प्रश्नांवर आपणच उत्तरे शोधत आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसच्या वतीने आयोजित ‘इनोफेस्ट समिट २०२१’ या कार्यक्रमात करमळकर बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू एन. एस. उमराणी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे, ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, मुख्य माहिती तंत्रज्ञ नीलकंठ पोमण, सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आणि अधिसभा सदस्य संतोष ढोरे उपस्थित होते.
या इनोफेस्ट २०२१ मध्ये २०४ संघांच्या माध्यमातून एक हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील निवडक ३४ गटांना बूट कॅम्पद्वारे ३३ तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. त्यातील काही कल्पना पुढील काळात स्टार्टअपमध्ये रूपांतरीत करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
डॉ. करमळकर म्हणाले, हवा, पाणी यामध्ये सध्या होत असलेल्या प्रदूषणाबाबत अनेक विद्यार्थ्यांनी उपाय सुचवले आहेत. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यापीठातील अनेक विभागांमध्येही या विषयावर अनेक संशोधन व प्रकल्प सुरू आहेत.
---
‘स्वच्छतागृहांचा चांगल्या प्रकारे वापर व देखभाल’ प्रकल्पाला प्रथम पारितोषिक इनोफेस्ट समिट २०२१ मध्ये आकांक्षा शिंदे हिने सादर केलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा चांगल्या प्रकारे वापर व देखभाल या विषयावरील प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे ३ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. श्रीष सिंग याच्या ई-कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावरील प्रकल्पाला द्वितीय क्रमांकाचे तर प्रतीक्षा थोरात हिच्या डेटा मॉनिटरिंग यूजिंग आयोटी सिस्टीम या प्रकल्पास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
---
विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
पुणे विद्यापीठ ‘आय टू इ’स्पर्धेत कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या श्रेणीक मुथाने प्रथम क्रमांकाचे तर पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील अभिषेक चौधरीने द्वितीय क्रमांकाचे आणि पारितोषिक पटकवले. तसेच अनुराग लंबोर आणि गौरव दुधे या विद्यार्थ्यांना क्लाउड क्यू कंपनीकडून नोकरीची संधी देण्यात आली आहे.