सदाचाराने वाटचाल करत आत्मनिर्भर व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:15 AM2021-02-26T04:15:40+5:302021-02-26T04:15:40+5:30
पुणे : पदवीधरांनी यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवत मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा. त्यातूनच नवा ...
पुणे : पदवीधरांनी यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवत मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा. त्यातूनच नवा भारत निर्माण होईल. तसेच सदाचाराने वाटचाल करत आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यीपीठाचा तिसरा दीक्षान्त समारंभ ऑनलाईन पद्धतीने पार पडला. या वेळी कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमास इस्त्रोचे माजी संचालक डॉ. के. राधाकृष्णन, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटी ग्रुपचे कार्याध्यक्ष राहुल कराड, एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुचित्रा नागरे-कराड, डॉ. सुनील कराड, स्वाती चाटे-कराड, डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश देशपांडे, डॉ. जब्बार पटेल, दीपक शिकारपूर, परीक्षा विभागाचे प्रमुख ज्ञानदेव निलवर्ण उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व पदवी प्रमाणपत्र दिले. तसेच पीएच.डी. व सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कोश्यारी म्हणाले, सध्या आपण आर्टिफिशल इंटेलिजेशनच्या गोष्टी करतो, मात्र संत ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञ आणि वेद हेच खरा अर्थ सांगतात. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि डिझाईन व अन्य कोणत्याही शाखेचे शिक्षण घेत असताना अध्यात्माचा अभ्याससुध्दा करावा. आत्मनिर्भरतेचा विचार करत नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या यशस्वी जीवनासाठी उपयोग करावा. नोकरीसाठी शिक्षण न घेता भविष्यात इतरांना नोकरी देणारे म्हणून पुढे यावे. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. याचा योग्य उपयोग करून भारताच्या विकासाला हातभार लावावा.