मुख्यमंत्री कोणीही व्हा; पण महागाई कमी करा...! पुणेकरांच्या शिंदे सरकारकडून अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 09:46 AM2022-07-05T09:46:31+5:302022-07-05T09:46:38+5:30

राजकीय सत्तांतरानंतर सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली भावना

Be the CM anyone But reduce inflation Expectations from Shinde government of Pune citizens | मुख्यमंत्री कोणीही व्हा; पण महागाई कमी करा...! पुणेकरांच्या शिंदे सरकारकडून अपेक्षा

मुख्यमंत्री कोणीही व्हा; पण महागाई कमी करा...! पुणेकरांच्या शिंदे सरकारकडून अपेक्षा

Next

पुणे : एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु, बंडखोरी करून त्यांनी चुकीचे केले आहे. शेवटी मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. मुख्यमंत्री कोणीही असो; मग तो रिक्षा ड्रायव्हर असो किंवा चहा विकणारे. आम्हाला काहीही फरक पडत नाही. गॅस स्वस्त करा, जीवनावश्यक वस्तू स्वस्त करा, महागाई कमी करा, आरोग्यदायी सुविधा आणि शिक्षणही स्वस्त करा, यातच आमचे समाधान, अशी भावना पुणेकरांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्रिपदी निवडून आलेले एकनाथ शिंदे यांनी साेमवारी विधानसभेत बहुमत शाबीत केले. त्यावर पुणेकरांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला असता अनेकांनी वरील मत व्यक्त केले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याचे बहुसंख्य नागरिकांना रुचले नसल्याचे यात दिसून आले. आता त्यांनी सरकार स्थापन केलेच आहे, तर लोकहिताची कामे करावीत, महागाई कमी करावी, शिक्षण स्वस्त करावे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

नागरिक म्हणतात...

- अजय कदम (पेट्रोल पंप कर्मचारी) : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ही आनंदाची बाब आहे. परंतु, बंडखोरी करून चुकीचं केलं. शेवटी मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला.
- गणेश कांबळे (रिक्षा चालक) : मुख्यमंत्री कोणीही असो, मग तो रिक्षाचालक असो किंवा चहा विकणारे, आम्हाला काही फरक पडत नाही. गॅस स्वस्त करा. शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या. महागाई कमी करा.
- अशोक परदेशी (फळाचे दुकानदार) : एकनाथ शिंदे माणूस म्हणून उत्तम आहे. खरा शिवसैनिक आहे. महाराष्ट्र सरकारसाठी बदल घडवेल आणि चांगले काम करेल.
- गंगाराम पाटोळे (शाळा क्लार्क) : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, चांगली गोष्ट आहे; पण बंडखोरी करून शिवसेनेला धोका दिला. ज्यांनी आपल्याला मोठे केले, त्यांना धोका दिला. आता तरी त्यांनी लोकहिताची कामे करावीत.
- सुरंदर दंबे (चहा दुकानदार) : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला. गद्दारी करून सत्ता बळकावलेले हे सरकार काय जास्त दिवस टिकणार नाही. दोन वर्षांनंतर कोण विचारणार यांना. आता सरकार स्थापन केले तर महागाई कमी करावी.
- संभाजी शेंडकर (बँक कर्मचारी) : एकनाथ शिंदे माणूस चांगला आहे; पण बंडखोर आहे. कुठल्याही पक्षाचा असो किंवा रिक्षा चालक असो, बंडखोर नेता महाराष्ट्राच्या राजकारणात टिकत नाही.
- अमोल खुडे (डिलिव्हरी बॉय) : कोणीही एकदा मंत्री किंवा मुख्यमंत्री हाेताे याचेच बघतो. सामान्य जनतेचा त्याला विसर पडतो. त्यांनी जनतेची कामे करून लाेकांची मने जिंकावी, तरच त्यांचा पुढे निभाव लागेल.

Web Title: Be the CM anyone But reduce inflation Expectations from Shinde government of Pune citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.