तुमच्या टाकाऊ चपला देतात त्यांना उभं राहण्याची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 07:27 PM2018-06-18T19:27:19+5:302018-06-18T19:28:40+5:30

देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत या कवितेतल्या दातृत्वाचा संदेश डोळ्यासमोर ठेवत पुण्यातली बेअर फूट फाउंडेशन ही संस्था काम करत आहे.

Bear foot foundation work for needy people at pune | तुमच्या टाकाऊ चपला देतात त्यांना उभं राहण्याची शक्ती

तुमच्या टाकाऊ चपला देतात त्यांना उभं राहण्याची शक्ती

Next
ठळक मुद्देबेअर फूट फाउंडेशनचा उपक्रम :टाकाऊ चपलांचा गरजूंपर्यंतचा प्रवास अनवाणी ''पायां''चा "ताण" होणार कमी

पुणे : देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत या कवितेतल्या दातृत्वाचा संदेश डोळ्यासमोर ठेवत पुण्यातली बेअर फूट फाउंडेशन ही संस्था काम करत आहे. या संस्थेतर्फे शहरातील विविध भागातून वापरलेले आणि कोणत्याही आकाराचे चपला, बूट, स्लिपर गोळा करून त्याअभावी  जखमी होणाऱ्या, दुखणाऱ्या पायांना आराम देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

      दीपाली पांढरे, संयोगिता कुदळे आणि विकास मुंदडा असे तिघेजण मिळून हे काम करत आहे. गेली काही वर्ष दीपाली या गुडविल इंडिया या संस्थेतर्फे गरजूंसाठी कपडे गोळा करण्याचे काम करत होत्या. त्यावेळी त्यांना अनेकांकडून चपलांची मागणी होताना दिसली. अखेर मार्च महिन्यापासून त्यांनी गुडविलसोबतच या कामाची सुरुवात केली. हे काम करत असताना त्यांनी   सुरुवातीला एक मेसेज समाज माध्यमांच्या मदतीने व्हायरल केला आणि अक्षरशः चपलांचा पाऊस पडला. त्यांना लहान मुलांपासून ते प्रत्येक मापाच्या चपला दात्यांनी दिल्या. केवळ चपलाच नव्हे तर हजारो रुपयांचे ब्रँडेड शूजही काहींनी दिले.यात चांगल्या चपलांसह अनेक फाटलेल्या, अंगठा गेलेल्या चपला मिळतात. काहीवेळा तळवा झिजलेल्या, नाडी गेलेले बूटही मिळतात. याशिवाय पोलिओ रुग्णांचे कमी अधिक होणारे विशेष बूटही काहींनी दिले आहेत. अशावेळी बेअर फूटची टीम आणि चपला दुरुस्तीतील एक निष्णात व्यक्ती बसून चपलांचे वर्गीकरणाचे काम करतात. 

         चपला आणल्यावर त्यांचे वाटप करण्याचे आव्हानही संस्थेने पेलले आहे. अनेक शाळांमध्ये, आश्रमांमध्ये  गरजू विद्यार्थ्यांना स्पोर्ट शूज किंवा चपला, सॅंडल असे हवे ते वाटले जातात. याही वेळी या चपला पर्याय असून नव्यांसारख्या टिकणार नाही हे समजवले जाते. रॉबिनहूड संस्थेतर्फे दर पंधरवड्याला आदिवासी पाड्यांवर वाटण्यासाठी सुमारे ७०० चपलांचे जोड ही संस्था पुरवत आहे.याबाबत दीपाली यांनी बोलताना दिवसेंदिवस दात्यांचा प्रतिसाद वाढत असल्याची प्रतिक्रिया नोंदवली.चपला किंवा स्लीपर अनेकजण देतात पण खेळाडूंना लागणारे स्पोर्ट शूज आमच्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला एका व्यक्तीकडे चपला दुरुस्तीचे काम दिल्यावर आम्हीही बूट पोलिश आणि छोटी मोठी दुरुस्ती शिकल्याचे त्यांनी नमूद केले.संस्था सोसायट्यांची मागणी केल्यास चपला जमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्त्रिया अनेकदा बचत करण्यासाठी खराब झालेल्या चपला अगदी टाकाऊ होईपर्यंत वापरतात. अशावेळी बालकांच्या किंवा पुरुषांच्या चपलांपेक्षा अतिशय खराब अवस्थेतील महिलांच्या चपला संस्थेला दानात मिळाल्या आहेत. त्या संस्थेने जरी स्वीकारल्या असल्या तरी त्यांची अवस्था वापरण्याच्या पलीकडे असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Bear foot foundation work for needy people at pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.