शिष्यवृत्ती बंद केल्याने धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:48+5:302021-03-18T04:10:48+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे, अजिंक्य सुरवसे, वैभव बोचरे, राहुल यमगर, सुहास तरंगे, भिवाजी मार्कड, ...
राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे, अजिंक्य सुरवसे, वैभव बोचरे, राहुल यमगर, सुहास तरंगे, भिवाजी मार्कड, गणेश पवार असे ३० ते ४० विद्यार्थी धरणे आंदोलनाला बसले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतला.
चार विद्यापीठांची मिळून १८७ महाविद्यालये राज्यभरात आहेत. सुमारे १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी पसंतीचे महाविद्यालय मिळावे म्हणून प्रतीक्षा करीत असतात. तीन फेऱ्या झाल्यानंतर चौथ्या फेरीच्या वेळी हे विद्यार्थी स्पॉट ॲडमिशन घेतात. या प्रकारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ५ ते ६ हजार असते. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जे लाभ मिळतात तेच लाभ देखील स्पॉट ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे मिळणारी शिष्यवृत्ती होय. या अभ्यासक्रमासाठी वर्षभराचे शुल्क सुमारे ५७ हजार आहे. शिष्यवृत्ती मिळाली, तर वार्षिक शुल्क त्याला माफ होते. शिष्यवृत्तीच बंद केल्याने आता ते शुल्क विद्यार्थ्यांनी भरावे अशी सूचना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना केली आहे. त्यामुळे एवढी मोठी रक्कम ऐनवेळी कशी भरावी, हा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. ही माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला दिली.
शेतकऱ्यांच्या मुलांना रस्त्यावर उतरण्याची आली वेळ
एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. तर, दुसरीकडे शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या मुलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणली आहे. शेतकऱ्यांची आणि त्यांच्या मुलांची कोणत्याही सरकारला परवा नाही. असा आरोप कोकरे यांनी केला.