आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:10+5:302021-04-08T04:11:10+5:30
पुणे : काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. पहिल्या लॉकडाऊनपासून ...
पुणे : काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. पहिल्या लॉकडाऊनपासून सलून व्यावसायिकांना दीर्घ काळ व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. आता पुन्हा व्यवसाय बंद करावा लागल्याने या व्यावसायिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० एप्रिलपर्यंत व्यवसाय बंद असल्याने आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच करावी लागणार आहे.
सुरक्षित अंतर पळाले नाही तर कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका अधिक यामुळे याचा पहिला फटका सलून व्यावसायिकांना बसला. या कारणामुळे त्यांचा व्यवसाय धोक्यात आला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होताच ऑक्टोबरअखेर व्यावसायिकांना अटी-शर्तींसह व्यवसायास परवानगी दिली. वर्षभर आर्थिक संकटाचा सामना करताना दमछाक झाली. आता कुठे व्यवसायाची आर्थिक घडी बसत असताना पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागल्याने या व्यवसायावर आर्थिक संकट कोसळली आहे. थकलेले भाडे, बँक हप्ते, मुलांची शाळेच्या शुल्क, कामगारांचा पगार, घरातील दैनंदिन खर्च, थकलेले वीज बिल या व अशा अनेक गोष्टींना तोंड कसे देयचे हा प्रश्न असताना कोणताही विचार न करता पुन्हा सरकारने व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितल्यामुळे पायाखाली वाळू सरकली आहे, असे सलून व्यावसायिकांनी सांगितले.
चौकट
भाडे निघणेही होत आहे अवघड
कोरोनाच्या भीतीने ग्राहकांची संख्या कमीच आहे. पूर्वी येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येपेक्षा सध्याच्या संख्येत बराच फरक पडल्याने दुकाने भाडे निघणेदेखील अवघड होत आहे. तसेच या व्यवसायवर परप्रांतीयांनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे मूळ नाभिक समाजाला याचा मोठा फटका बसला आहे, असे नाभिक व्यावसायिकांनी सांगितले.
१५०००
पुणे जिल्ह्यात एकूण केशकर्तनालये
५०००
बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या
आता घर कसे चालवायचे
सरकारने आमचा विचार करण्याची गरज आहे. वर्षभर कसे दिवस काढले हे आमचे आम्हालाच माहिती आहे. सगळे सुरळीत चालले असताना अचानक बंद करणे परवडणारे नाही. एकवेळ अन्न मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- मोनिश शर्मा, सलून व्यावसायिक
वर्षभर व्यवसाय बंद ठेवल्याने खाण्याचे वांदे झाले. पैसेच येणार नसतील मुलाबाळांना काय खायला घालावे. मागील वर्षभराचे दुकान भाडे अद्याप फेडलेले नाही. आता हा महिनादेखील अंगावर पडला आहे. कठीण अवस्था आहे. सरकारने आर्थिक दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घ्यावा.
- प्रदीप साळुंखे, सलून व्यावसायिक
सलून व्यवसायावर ५ सदस्यांचे कुटूंब अंवलंबून आहे. हा धंदा सोडून दुसरा कोणता धंदा करावा हे देखील समजण्यापलीकडे आहे. आजारपण, शिक्षणासाठी पैसे, दैनिक खर्च इतर खर्च कसा भागवायचा हा मुख्य प्रश्न आहे. सरकार मदत करणार नाही, याची जाणीव आहे. उपाशी मारण्याची पाळी आली आहे.
- अशोक पालकर, सलून व्यावसायिक
कोट
कोणताही विचार न करता परस्पर निर्णय घेऊन या समाजाला खाईत ढकले आहे. सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय केला जात होता. सरकारने आमच्या मागण्यांकडे कधीही लक्ष दिले नाही. व्यावसायिक रडकुंडीला आलेले आहेत. नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी.
- नीलेश पांडे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक मंडळ