बीट मार्शलच्या दुचाक्या नादुरुस्त

By admin | Published: April 22, 2016 12:49 AM2016-04-22T00:49:49+5:302016-04-22T00:49:49+5:30

शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बीट मार्शल यांना देण्यात आलेल्या अनेक दुचाक्या जुन्या झाल्या असल्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहेत.

Beat Marshall's Bike Bad | बीट मार्शलच्या दुचाक्या नादुरुस्त

बीट मार्शलच्या दुचाक्या नादुरुस्त

Next

नेहरुनगर : शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बीट मार्शल यांना देण्यात आलेल्या अनेक दुचाक्या जुन्या झाल्या असल्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहेत. अनेक दुचाकींना पिकअप नसल्यामुळे अनेक घटनांत चोरांचा पाठलाग करताना डोळ्यासमोरून चोरटे ‘धूम स्टाईल’ निसटून जातात. दलाच्या वतीने पोलिसांना आठ वर्षांपूर्वी १५० सीसीच्या दुचाक्या शहरातील भोसरी, पिंपरी, चिंचवड, निगडी, वाकड, हिंजवडी, सांगवी, भोसरी एमआयडीसी, चतु:शृंगी या पोलीस ठाण्यांना प्रत्येकी ४ आणि प्रत्येक चौकीला एक दुचाकी देण्यात आली. नागरिकाने १०० क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी तातडीने बीट मार्शलना पोहोचण्यासाठी या दुचाक्यांचा वापर केला जातो.
बीट मार्शल दिवस-रात्र हद्दीत गस्त घालण्याचे काम करीत असतात. दिवसा आणि रात्र पाळीच्या बीट मार्शलसाठी एकच दुचाकी असल्यामुळे एका दिवसात अंदाजे १०० ते १२० किलोमीटर अंतर दुचाकी कापते. आतापर्यंत दीड ते दोन लाखांपेक्षा जास्त किलोमीटरचा पल्ला या दुचाक्यांनी गाठल्याने वारंवार त्या नादुरुस्त होतात. त्या दुरुस्तीसाठी शिवाजीनगर मोटार परिवहन कार्यशाळेत पाठवल्या जातात. या काळात संबंधित बीट मार्शल स्वत:ची दुचाकी वापरतात. काही वेळा बीट मार्शललाच दुरुस्ती करावी लागते.
अनेक दुचाक्या जुन्या झाल्याने त्यांचे स्टार्टर खराब झाले आहे. काहींची बॅटरी खराब झाली आहे. पुरेसा प्रकाश नसल्यामुळे रात्रीच्या वेळी हद्दीत गस्त घालत असताना अंधाराच्या भागात पोलिसांना कसरत करावी लागते. पिकअप नसल्यामुळे अनेक वेळा सोनसाखळी चोरट्यांचा इतर चोरीच्या आरोपींच्या दुचाकीचा पाठलाग करताना चोरटे धूम स्टाइलने पळून जातात. नागरिकाने १०० क्रमांकावर कंट्रोल रूमला संपर्क साधल्यानंतर बीट मार्शलला घटनास्थळी सात मिनिटांत घटनास्थळी पोहोचावे लागते. मात्र, पिकअप नसल्याने वेळेवर पोहोचता येत नाही. परिणामी, गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी होतात. (वार्ताहर)एके दिवशी पहाटे अडीचच्या सुमारास गस्त घालत असताना आमच्या समोरून एक चोर ट्रक चोरून घेऊन जात असताना पाहिले. आम्ही हा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चोर ट्रक अतिवेगात पळून जाऊ लागला. दुचाकी सुरू करून त्या ट्रकचालकाचा पाठलाग केला असता, पिकअप नसल्यामुळे पाठलाग करताना अधिक वेळ लागत होता. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रकचालक पुढे जाऊन ट्रक सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. अनेक वेळा आरोपींचा पाठलाग करताना दुचाक्यांना पिकअप कमी असल्यामुळे अनेक वेळा चोरटे पळून जाण्यात यशस्वी होतात. यामुळे बीट मार्शल पोलिसांना नवीन, आधुनिक जास्त सीसी असलेल्या दुचाक्या देण्यात याव्यात. जेणेकरून तत्काळ घटनास्थळी जाता येईल, असे बीट मार्शलने सांगितले.

Web Title: Beat Marshall's Bike Bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.