लाईनबॉयची दारु पिऊन महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 04:06 PM2020-05-11T16:06:45+5:302020-05-11T16:23:26+5:30
दारु विक्री सुरु झाल्यापासून मारामार्या,भांडणांच्या घटनांमध्ये वाढ
पुणे : सार्वजनिक रस्त्यावर दारु पिऊन गोंधळ घालणार्यांना घरी जाण्यास सांगितल्याने त्यांनी महिला पोलीस हवालदारास धक्काबुक्की करुन पाहून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार विश्रांतवाडी पोलीस वसाहतीसमोर रविवारी
सायंकाळी साडेसात वाजता घडला. लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांची संख्या जवळपास थांबली होती. दारु विक्री सुरु झाल्यापासून दारु पिऊन मारामार्या,भांडण्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्ह्याव्यतिरिक्त इतर गुन्हे दाखल करण्यात येत नसल्याने ते कागदोपत्री दिसून येत नाही. सुबोध लोखंडे (वय २०), प्रकाश ऊर्फ टग्या जाधव (वय २५, रा. दोघेही विश्रांतवाडी पोलीस वसाहत) या दोघा लाईनबॉयच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्ल तसेच साथ रोग प्रतिबंधक अधिनियम, आपत्तीव्यवस्थापन २००५ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी महिला पोलीस हवालदार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिला हवालदार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. आरोपी हे भांडण करीत असल्याचा पोलीस नियंत्रण कक्षातून त्यांना कॉल मिळाला. त्यानुसार त्या व सायप्रस बीट मार्शल घटनास्थळी पोहचले. तेव्हा लोखंडे व जाधव हे रस्त्यावर दारु पिऊन तोंडाला मास्क न लावता आढळून आले. त्यांनी दोघांना घरी जाण्यास सांगितले. तेव्हा लोखंडे हा त्यांच्या अंगावर धावून आला. त्याने मी लाईनबॉय आहे, तुला काय करायचे ते कर, असे म्हणून त्यांना धक्काबुक्की केली. प्रकाश जाधव याने आम्ही जात नाही तुला काय करायचे ते कर तुला बघून घेतो, असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला.लाईनबॉयने दारुच्या नशेत महिला पोलीस हवालदारासोबत धक्काबुक्की केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस वसाहतीत भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला फायटरने मारहाण करण्यात आली होती.
पोलीस लाईनमधुन बाहेर जाण्यास एकच प्रवेशद्वारे उघडे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाहेर जाणार्या व येणार्या सर्वांची नोंद करण्याससांगितले आहे. जे नागरिक कामाशिवाय वारंवार बाहेर जात असतील अशांची
माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.तरीही पोलीस लाईनमधील तरुण दारु पिऊन गोंधळ घालत आहेत.